हाथरस प्रकरण : आरोपीचे राजकीय पक्षांशी लागेबांधे, देणग्या मिळत असल्याचे चौकशीत उघड!
07-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. अटकेत असलेल्या देवप्रकाश मधुकर याचे राजकीय पक्षांसोबत लागेबांधे असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असून हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस येताना पाहायला मिळत आहे. चेंगराचेंगरीचे मुख्य कारण म्हणजे जीटी रोडवर मोठ्या संख्येने येणारे लोक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, चरणराज यांना मंचावरून नेण्याची घोषणा करण्यात आली होती. भोले बाबा उर्फ सूरज पाल याचा ताफा जीटी रोडवरून गेला, त्यानंतर लोकांनी त्याच्या पायाची धूळ, वाहनाच्या चाकांच्या खुणा असलेली माती उचलण्यास सुरुवात केली. यावेळी नोकरांनी लोकांना धक्काबुक्की केल्याने चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हाथरस प्रकरणात संबंधित आणखी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर याच्यासह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. मधुकरला हाथरस न्यायालयात हजर करण्यात आले सुनावणी दरम्यान त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. हाथरस प्रकरणातील राजकीय संबंधांचाही पोलीस तपास करत असून चौकशीत मधुकरला राजकीय पक्षांकडूनही देणग्या मिळत असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक वृत्तानुसार, आयोजकांनी सत्संग सोहळ्यासाठी चुकीचा मार्ग निवडला होता. प्रवचन संपल्यानंतर जेव्हा सूरजपाल सिंह उर्फ भोले बाबा याचा ताफा बाहेर काढण्यात आला तेव्हा अनुयायांनी जीटी रोडवर गाठले. तेथे सेवकांनी पवित्र पाणी घेतलेल्या लोकांना धक्काबुक्की केली. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांना जीव गमवावा लागला. सूरजपालसाठी स्टेजपासून जीटी रोडपर्यंतचा एक्झिट रूट डावीकडून अलीगडच्या दिशेने जोडला गेला होता.