नवी दिल्ली : तामिळनाडू बहुजन समाजवादी पक्ष(बसप) प्रमुख के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येच्या तपास प्रकरणी तामिळनाडू सरकार गंभीर नसल्याचा आरोप बसप अध्यक्षा मायावती यांनी केला आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नसून हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी मायावती यांनी केली आहे.
दरम्यान, दि. ०७ जून रोजी बसप अध्यक्षा मायावती यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, तामिळनाडू सरकार के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येच्या तपासाबाबत उदासीन आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणीदेखील त्यांनी निवेदनामार्फत केली होती. एका दलित नेत्याच्या हत्येबद्दल नाही. संपूर्ण दलित समाजाला धोका आहे आणि अनेक दलित नेते त्यांच्या जीवाला घाबरले आहेत, असे मायावती यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे के आर्मस्ट्राँग यांना अखेरचा निरोप देण्याकरिता मायावती चेन्नईत दाखल झाल्या होत्या. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद हे मायावती यांचे पुतणे आहेत, हे देखील त्यांच्यासोबत होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मायावती यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. ज्या प्रकारे आर्मस्ट्राँगची हत्या झाली आहे, त्यावरून असे दिसते की तामिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. मुख्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे मायावतींनी सांगितले.