विरोधकांच्या फेक नरेटीव्हची फडणवीसांकडून पोलखोल

स्मार्ट मीटर आणि अटल सेतूवरून विरोधकांना सुनावले

    03-Jul-2024
Total Views |

devendra fadanvis ans


मुंबई, दि.३ : प्रतिनिधी 
महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरवरून आणि अटल सेतूवर भेगा पडल्याबाबत विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात आला. या खोट्या प्रचाराची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि.३ रोजी विधान परिषदेत पोलखोल केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देण्यासाठी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यंमत्री फडणवीस यांनी पहिले महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरबाबत सभागृहात माहिती दिली. ते म्हणाले, स्मार्ट मीटरची योजना महाविकास आघाडीच्या काळात तयार झाली. निविदा काढल्या तेव्हा आठ कंपन्या पात्र होत्या. त्यामुळे कुणाच्या तरी एकट्याच्या फायद्याच्या आहेत, हा आरोपीच चुकीचा आहे. ५ कंपन्या समोर आल्या. त्यांना कार्यादेश देण्यात आले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही. हे सभागृहाच्या रेकॉर्डवर सांगतो आहे. त्यामुळे हा खोटा नरेटीव्ह बंद करा. हे मीटर सरकारी कार्यालय, महावितरण आस्थापना येथेच लावण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

पुढे बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या माध्यमातून अटल सेतूवर भेगा पडल्या बाबत करण्यात आलेल्या खोट्या प्रचाराला सडेतोड उत्तर दिले. याशिवाय इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती सभागृहाला दिली. ते म्हणाले, अटलसेतूला भेगा हाही फेक नरेटीव्हचा भाग होता. अर्पोच रोडला काही भेगा होत्या. केंद्र सरकारने आता वाढवण बंदराला मान्यता दिली. ₹७६,००० कोटींचा हा प्रकल्प आहे. हे बंदर जेएनपीटी पेक्षा तिप्पट असेल. जगातील कितीही मोठे जहाज वाढवण बंदरात येऊ शकेल. आपल्या अर्थव्यवस्थेत मोठी भर यातून पडेल. ज्यांच्याकडे मोठे पोर्ट आहेत, त्याच जगातील मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. स्थानिक लोकांशी आम्ही सातत्याने चर्चा करतो आहोत आणि त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी वचनबद्ध आहोत, असेही उपमुख्यंमत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.