ठाण्यात ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न

गडकरी रंगायतनमध्ये दिवसभर शिवजयघोष

    03-Jul-2024
Total Views |

rajyabhishek
 
ठाणे :ठाणे महापालिका आणि राज्याभिषेक समारोह संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक सोहळ्या दिनानिमित्त यावर्षीचा ३५१ वा राज्याभिषेक दिन नुकताच गडकरी रंगायतन येथे उत्साहात संपन्न झाला. पूर्ण दिवसभर शिवजयघोष करणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला आ. संजय केळकर यांनीही उपस्थिती दर्शवली.
सकाळी पहिल्या सत्रामध्ये विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आनंदवन भुवनी या विषयावर श्रोत्यांना मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध केले.
 
त्यानंतर सुप्रसिद्ध कीर्तनकार रोहिणीताई परांजपे यांनी हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा या विषयावर शिवरायांच्या चरित्राची आणि चारित्र्याची महती विषद करून श्रोत्यांना खिळवून ठेवले. दुसऱ्या सत्रामध्ये कला प्रांगणतर्फे गणेश वंदना सादर केल्यानंतर प्रख्यात बासुरीवादक विवेक सोनार यांच्या शिष्यवृंदांनी शिवकल्याण राजा मधील गीते बासरीवर वादन करून अप्रतिम सुमनांजली सादर केली. कोल्हापूर येथील शाहीर कृष्णात पाटील यांनी अप्रतिम पोवाडे सादर करून श्रोत्यांमध्ये वेगळ्या प्रकारे उत्साह आणि चैतन्य निर्माण केले.
 
एकलव्य क्रीडा मंडळ येऊर येथील किशोर म्हात्रे यांच्या संस्थेने मल्लखांब सादरीकरण करून अनोख्या पद्धतीने शिवरायांना मानवंदना देताच श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करुन दाद दिली. यावेळी मर्दानी प्रात्यक्षिकांचा भाग म्हणून शिवगर्जना प्रतिष्ठान यांच्यातर्फे तलवारबाजी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
नृत्यधारा ठाणे यांनी शिवजन्म ते शिवराज्याभिषेक या कार्यक्रमात प्रत्येक गाण्यावर सुंदर नृत्य सादरीकरण करून नृत्यातुन शिवचरित्राचे विलोभनीय दर्शन घडवले.
 
अजित आपटे यांनी राज्याभिषेक सोहळ्याचे महत्व विषद करून शिवचरित्र आचरणात आणण्यासाठी काय करायला हवे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम रंगत असताना जाणता राजा च्या कलाकारांनी शिवराज्याभिषेक सोहळा साकारून शिवभक्तांना पूर्ण सर्व प्रसंगांचे सादरीकरण करून सर्वांना शिवकाळाची अनुभूती देताच उपस्थित श्रोत्यांनी उभे राहून सर्व कलाकारांना मानवंदना दिली.
 
सोहळ्याची सांगता पंढरपूर येथील संतोष भोसले यांनी माझ्या राजा रे, माझ्या शिवबा रे हे गाणं सेक्साफोन या वाद्यावर सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीनी भावविभोर करीत उपस्थितांची मने जिंकली. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रथमेश सप्रे आणि कु. मानसी आमडेकर यांनी केले.