‘बालगंधर्व’साठी सुबोध नव्हे तर 'या' अभिनेत्यांच्या नावाचा केला होता विचार

    02-Jul-2024
Total Views |

Subodh bhave 
 
 
 
 
मुंबई : ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ६३व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा कॅलिडोस्कोप’ अंतर्गत आयोजित केलेल्या ‘बायोपिक आणि मी’ या कार्यक्रमात अभिनेते सुबोध भावे, प्रसाद ओक आणि सुनील बर्वे यांनी त्यांचे अनुभव सांगितले. चरित्रपटांशी त्यांचं असलेलं विशेष नातं, महान व्यक्तिमत्त्वांसारखं दिसणं, त्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशा अनेक विषयांवर त्यांनी डोंबिवलीकरांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी बालगंधर्व चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत प्रमुख भूमिकेसाठी सुबोध भावे नाही तर दुसऱ्याच अभिनेत्याची निवड केल्याचे देखील भावे यांनी सांगितलं.
 
बालगंधर्व, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसंच डॉ. काशिनाथ घाणेकर या महान व्यक्तिमत्त्वांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे आजवर तीन बायोपिक केले आहेत. चरित्रभूमिकांची सुरुवात कशी झाली असं विचारलं असता तो म्हणाला, “‘‘बालगंधर्व’ या चित्रपटाच्या वेळी सुरुवातीला त्या भूमिकेसाठी प्रसाद ओक आणि सुनील बर्वे यांच्याच नावांचा मी विचार केला होता. मग काही दिवसांनी ‘मी का नको?’ असा विचार करून त्या भूमिकेसाठी मी स्वत:चीच परीक्षा घेतली आणि निवड केली’; असं सुबोध भावे यानं सांगितलं.
 
पुढे तो म्हणाला की, ‘‘बालगंधर्व’ हा चित्रपट पाहून अभिनेते शरद पोंक्षे यांनी मला लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित गंगाधर गाडगीळ यांची ‘दुर्दम्य’ ही कांदबरी भेट म्हणून दिली. ती वाचल्यानंतर पुण्यात केसरी वाड्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर राहत असूनही आपल्याला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणाऱ्या या महान नेत्याविषयी अतिशय त्रोटक माहिती आहे, याची मला खंत वाटली. दुर्दैवानं आपल्या शालेय अभ्यासक्रमात लोकमान्य टिळक दोन गुणांपुरते मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांची महती नव्या पिढीला कळावी, या हेतूनं त्यांचा चरित्रपट करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पूर्वतयारी करत होतो. तेव्हा योगायोगानं दिग्दर्शक ओम राऊतही टिळकांवरील चरित्रपटाची तयारी करत होता. त्यानं मला चक्क लोकमान्यांच्या भूमिकेसाठी विचारलं. मी कुठूनही त्यांच्यासारखा दिसत नाही. त्यांच्या स्वभावातील कणखरपणा माझ्यात नाही, असं मला वाटत होतं; परंतु रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी ती किमया साधली आणि मी लोकमान्य साकारले,’ असं सुबोध यानं लोकमान्य करतानाची आठवण सांगितली. ‘लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत असताना आपण एका महान व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारतोय, याचं भान होतं. त्या वेशात असताना मी कुणालाही जवळपास फिरकू द्यायचो नाही. चेष्टा सुबोध भावेची करा, लोकमान्यांची नाही, असं सर्वांना बजावलं होतं”, , असंही सुबोधनं सांगितलं.
 
“ बालगंधर्व यांनी त्यांच्या सर्व नाटकांचं चित्रीकरण करून ठेवलं होतं. मात्र तो सर्व ठेवा दुर्देवानं नष्ट झाला. फक्त ‘अमृतसिद्धी’ या नाटकाचं चित्रीकरण पुण्याच्या नॅशनल अर्काइव्हमध्ये उपलब्ध आहे. ती प्रिंट खराब असली तरी प्रत्यक्ष बालगंधर्वांचा अभिनय त्यात पाहायला मिळतो,” असंही सुबोध म्हणाला.