ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ ठरणार महायुती सरकार!

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात निवेदन

    11-Jul-2024
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : ड्रग्ज विक्रीला आळा घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी सभागृहात निवेदन केलं. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ड्रग्ज विक्रीसंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. यावर फडणवीसांनी विस्तृतपणे उत्तर दिलं.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज आपल्या समाजापुढे अमली पदार्थांचं एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे हा विषय अत्यंत चिंतेचा आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने एक बैठक घेतली असून सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना एक जॉईंट अॅक्शन प्लान दिला आहे. पण केवळ एका राज्याने ड्रग्जवर कारवाई करून चालणार नाही."
 
हे वाचलंत का? -  वाघनखांवरील विरोधकांच्या आरोपांना मुनगंटीवारांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
 
"ड्रग्ज विक्रीचे सध्या अनेक वेगवेगळे विक्री केंद्र सुरु झाले आहेत. इंस्ट्राग्राम, फेसबूकच्या चॅटमध्येही त्याची विक्री होते. त्यामुळे तंत्रज्ञानानेसुद्धा एक मोठं आव्हान आपल्यासमोर उभं केलं आहे. या सगळ्या गोष्टींसंदर्भात आता आपण एक शून्य सहनशीलता धोरण हाती घेतलं आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांनी याबाबत मिटींग घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवावा, अशी सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आता बंदरांवरसुद्धा स्कॅनर आणण्यात आले आहेत. त्याद्वारे कंटेनरमध्ये कुठलाही अमली पदार्थ असल्यास तो शोधता येतो. तसेच कुरियर आणि पोस्टाला भेटी देण्यात आल्या असून त्यांनी कशाप्रकारे हे ओळखावं याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तयार करण्यात आलेले नवीन विक्री केंद्र कशाप्रकारे संपवण्यात येतील, यासाठीही प्रयत्न करण्यात आले आहेत. यासोबतच फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज शोधणं सर्वात महत्वाचं आहे. मागच्या वर्षी मुंबईत अशा प्रकारचा ४०० कोटी रुपयांचा माल पकडला होता. संपूर्ण महाराष्ट्रात मागील वर्षी १२ हजार ६४८ कारवाया केल्या असून त्यात ८९७ कोटी रुपयांचा माल मिळाला होता. यावर्षी मे महिन्यापर्यंत ६ हजार ५२९ कारवाया केल्या असून यात ४ हजार १३१ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. या सगळ्या प्रकारात पोलिसांचा सहभाग असल्यास त्यांना बडतर्फ केलं जाईल. यापूर्वी अशा ६ पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं आहे," अशी माहितीही फडणवीसांनी यावेळी दिली.