पुण्याच्या विकासासाठी ५० वर्षांचे व्हिजन : खा. मुरलीधर मोहोळ

    09-Jun-2024   
Total Views |
talk with muralidhar mohol

 
शिक्षण, सामाजिक चळवळी, राजकीय चळवळी, आर्थिक चळवळी या सर्वांचे पुणे प्रमुख केंद्र. अशा शहराचा लोकप्रतिनिधीही तेवढाच सक्षम हवा. पुण्याच्या ताकदीची नेमकी जाण असलेले मुरलीधर मोहोळ हे शहराचे खासदार झाले आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे नवी दिल्ली प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी त्यांच्याशी विशेष संवाद साधला. त्यावेळी पुण्याच्या विकासासाठी पुढील ५० वर्षांचे व्हिजन ठेवून काम करणार असल्याचा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
 

पुण्यासाठी तुमचे व्हिजन काय?

पुण्यासाठी काही विषय महत्त्वाचे आहेत.सध्याच्या विमानतळाचे विस्तारीकरण, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या कामास प्रारंभ करणे आणि वेग देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे, पुण्यातील वाड्यांचा प्रश्न सोडवणे, वारसास्थळांचे संवर्धन करणे, पुण्याची कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून देशात पुण्याचे असलेले महत्त्वाचे स्थान कायम ठेवण्यासाठी आपण काम करणार आहोत.

 
पुण्याचा वाढता विस्तार पाहता पायाभूत सुविधा हा कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी आपले काय धोरण असेल?

पुणे हे अगणित संधींचे शहर असल्याने ते सातत्याने विस्तारतच राहणार आहे. त्यासाठी बदलत्या परिस्थितीनुसार पुण्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम केले जाणार आहे. त्यामध्ये मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार करणे, शहर बस वाहतुकीमध्ये सुधारणा करण्यास प्राधान्य दिले जाईल. पुण्यातील दोन कॅन्टोन्मेंट मंडळांचे विलीनीकरण करणे, कॅन्टोन्मेंट भागातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्नदेखील कळीचा आहे. संरक्षण खात्याच्या अखत्यारितील काही जमिनींच्या अधिग्रहणाचा प्रश्न वेळोवेळी प्रलंबित राहतो, त्यासाठी केंद्र सरकारसोबत समन्वय साधून हा मुद्दा तातडीने सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.


पुण्याचा होणारा विस्तार आणि वाहतूककोंडी हे विषय सध्या ऐरणीवर आले आहेत. त्यासाठी सार्वजनिक वाहतुकीद्वारे कसा तोडगा काढणार? पुण्यास अन्य शहरांशी जोडण्यासाठी काय योजना आहे?
 
पुण्यात मेट्रोचे जाळे शक्य तितके वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मेट्रोचा नागरिकांना पुरेपूर वापर करता येणेही गरजेचे आहे. त्यासाठी पीएमपीएमएल आणि मेट्रो यांचा समन्वय साधण्यात येणार आहे. एकाच तिकिटावर मेट्रो आणि पीएमपीएमएलचा प्रवास पुढील काळात शक्य होणार आहे. त्याचवेळी मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठीची कनेक्टिव्हिटी पीएमपीएमएलद्वारे दिली जाणार आहे. त्यासाठी सध्या वनाझ ते रामवाडी मार्गावर रामवाडी स्थानकापर्यंत शटल बससेवेस प्रारंभ केला आहे. पुढील काळात असे पीएमपीएमएल-मेट्रोचे जाळे संपूर्ण शहरभर असणार आहे. त्यामुळे पुण्यातील कोणत्याही भागात कोठूनही अवघ्या काही मिनिटात पोहोचता येईल. वाहतुकीचा प्रश्न पुण्यात आज आहे, हे मान्य करावेच लागेल. मात्र, त्यावर तोडगा काढण्याची इच्छाशक्तीही आहे. त्याचवेळी पुण्यास अन्य शहरांशी जोडण्यासाठीही काम केले जाईल. आता पुणे ते मुंबई प्रवास अधिक वेगवान झाला आहे. लवकरच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे, त्यामुळे पुणे ते नवी मुंबई थेट रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी विचार करत आहोत.

पुण्यातील व्यावसायिक, युवा व्यावसायिक आणि स्टार्टअपच्या विकासासाठी आपले काय धोरण असेल?

पुण्यामध्ये व्यवसायासाठी सकारात्मक वातावरण आहेत, त्यात अधिक अनुकूलता आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्यासाठी पुण्यातील युवा व्यावसायिक असो किंवा स्टार्टअपद्वारे नव्या कल्पना मांडणारे असो, या प्रत्येकाशी चर्चा करू केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा मानस आहे.


पुण्यातील जुने वाडे, त्यांचा पुनर्विकास आणि वारसास्थळांचे संवर्धन यासाठी काय योजना आहेत?

शनिवार वाडा, लालमहाल आणि पुण्यातील अन्य वारसास्थळांचे संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यासाठी पुरातत्त्व खात्यासोबत चर्चा करून - समन्वय साधून काम केले जाईल. त्याचप्रमाणे जुने वाडे आणि त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्नही नागरिकांच्या सक्रीय सहभागातून सोडविला जाईल.


मुळा-मुठा शुद्धीकरण आणि नदी सुधारप्रकल्पाचे काय?

पुण्यात सध्या दोन प्रकल्प सुरू आहेत. पहिला म्हणजे नदीसुधार प्रकल्प आणि नदी पुनर्जीवन प्रकल्प. एका प्रकल्पात नदीस सोडले जाणारे सांडपाणी, अशुद्ध पाणी थांबविण्यासाठी जायकाच्या अर्थसहाय्यातून आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने काम केले जात आहे. तर, दुसर्‍या प्रकल्पास रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट सुरू आहे. त्यामुळे ही दोन्ही कामे वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य राहिल.

पुण्यात काही काळापासून भारतविरोधी प्रवृत्तींचा शिरकाव झाल्याचे दिसते. त्यावर लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका काय असेल?
 
कायदा व सुव्यवस्था कायम राखणे हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे. पुण्यात देशविघातक प्रवृत्तींना वाव नाही, त्याविरोधात पोलीस प्रशासनदेखील कठोर कारवाई करतच असते. देशाची सुरक्षा हा सर्वांत मोठा मुद्दा असून त्याच्याशी तडजोड कधीही केली जाणार नाही. पुण्यातील काही घटना निश्चितच काळजी करण्यासारख्या आहेत. मात्र, अशा प्रवृत्तींविरोधात सक्षमपणे काम करण्याचा विश्वास आहे.

भाजप पुन्हा मोठे यश मिळवणारच!
 
यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “जनमताचा कौल स्वीकारणे आवश्यक असते आणि आम्ही ते केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आता देशाच्या विकासासाठी काम करण्याचा संदेश आम्हाला दिला आहे. राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही, हे सत्य आहे. मात्र, त्याचे आत्मपरीक्षण करून पुन्हा एकदा मोठे यश मिळविण्यासाठी आम्ही सज्ज होऊ. पुण्याचा विचार करता पुण्यातील यश महत्त्वाचे ठरते. पुण्यातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे उमेदवार हे कसब्याचे विद्यमान आमदार आहेत, मात्र कसब्यातूनही आम्ही मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे जनतेशी सातत्याने संवाद ठेवणे, त्यांच्यासाठी वेळ देणे हेच विजयाचे गणित आहे. आगामी काळातही या सूत्राने काम करू.”