खड्ड्यांच्या तक्रारी २४ तासांत सोडवा

अतिरिक्त आयुक्तांचे यंत्रणांना निर्देश

    06-Jun-2024
Total Views |

abhijeet bangar

मुंबई, दि.६ : प्रतिनिधी 
पावसामुळे रस्त्यांवर तयार होणाऱ्या खड्ड्यांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतो २४ तासांमध्ये करणे ही यंत्रणा म्हणून जबाबदारी घ्यावी. पावसाळा कालावधीत मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे आणि एकसंघपणे कार्यरत आहे, याचा अनुभव नागरिकांना आला पाहिजे. त्यासाठी सर्व संयंत्रे आणि साहित्याची उपलब्धतता राहील याची खातरजमा करा. रस्त्यांची सर्व कामे दिनांक १० जूनपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरी मदतसेवा क्रमांक १९१६, समाजमाध्यमे, व्हॉट्सएप चॅटबॉट, पॉटहोल फिक्सिंग एप्लिकेशन तसेच दुय्यम अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक इत्यादी विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तसेच विभागनिहाय शोधण्यात आलेल्या खड्डे बुजवण्याची कार्यवाही शक्यतो २४ तासात पूर्ण करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
मुंबई महानगरातील पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून रस्त्यांच्या कामांशी संबंधित बाबींचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी घेतला. या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतल्यानंतर बांगर म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ७२ मास्टिक कुकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व मास्टिक कुकर संयंत्रांवर जीपीएस लावून त्याआधारे संयंत्रांच्या उपलब्धततेवर लक्ष ठेवले जाईल. त्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण मुंबईत जास्त पावसाच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्डे बुजविताना, प्राप्त तक्रारी लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत खड्डे बुजविता येतील अशा रितीने मार्गांचा क्रम आखावा, खड्डे बुजवताना चौकोनी आकारात मास्टिकद्वारे खड्डे व्यवस्थित भरावेत. नोंदणी प्रक्रिया करून मास्टिक कुकरसह सर्व संयंत्रांची यादी तयार करावी, अशा सूचना त्यांनी रस्ते विभागाला दिल्या.
मुंबई महानगरात सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश कामे पूर्णत्वाकडे आहेत, तर काही कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये मुंबई शहर भागात २४ ठिकाणी, तसेच पूर्व उपनगरात ३२ ठिकाणी तर पश्चिम उपनगरामध्ये ८७ ठिकाणी कामे सुरू आहेत. यातील बहुतांश रस्ते दिनांक ७ जून २०२४ पासून वाहतूकीसाठी उपलब्ध होतील. तर उर्वरीत काही रस्ते दिनांक १० जूनपर्यंत वाहतूकीसाठी खुले होतील, अशी माहिती बांगर यांनी दिली आहे.