ठाण्यात नमोss न.म्ह.'ठाणे' गडात शिंदेची सरशी

    04-Jun-2024
Total Views | 39
Naresh maske
 
ठाणे,दि.०४ : दीपक शेलार
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (नमो) यांचा करिश्मा आणि भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी (अजितदादा गट) व रिपाई महायुतीची संघटनात्मक ताकद यामुळे शिवसेनेचे नरेश म्हस्के (न.म्ह.) यांनी शिवसेना उबाठा गटाचे मावळते खासदार राजन विचारे यांच्यावर लिलया मात करीत 'ठाणे' गडावर विजयी पताका फडकवली. या विजयामुळे धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेचे 'ठाणे' असल्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. दरम्यान, उबाठा गटाकडून असली - नकली शिष्य तसेच एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असा अपप्रचार करूनही विशेष फरक पडला नाही. याउलट म्हस्के यांनी प्रचारात स्वतःऐवजी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर करण्यासह `नमो नम: वचननामा' जनतेसमोर ठेवून मतदाराला साद घातली आणि अवघ्या १२ दिवसात विजयाला गवसणी घालुन एकप्रकारे इंडी आघाडीला चपराक लगावली.
 
ठाणे लोकसभा मतदार संघात सर्वाधिक शहरी मतदार असुन या मतदार संघात भाजपला मानणारा किंबहुना भाजपशी एकनिष्ठ असलेला मतदार आहे. इथे भाजप - शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठी असल्याने यापूर्वी २०१४ आणि २०१९ ला मोदी लाटेचा लाभ युतीच्या राजन विचारे यांना झाला होता.दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे उबाठा आणि शिंदे गट ठाणे लोकसभेत एकमेकासमोर उभे ठाकले होते. उबाठाच्या विचारे यांची उमेदवारी लवकर जाहिर झाल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती, परंतु कार्यकर्त्याची फौज तोकडी पडल्याने ते अखेरच्या क्षणी अपयशाचे धनी ठरले. तर शिंदे गटाचे म्हस्के यांची उमेदवारी अखेरच्या क्षणी जाहिर झाली होती.तरीही अल्प कालावधीत महायुतीने प्रचाराचे रान पेटवत 'ठाणे' मोदीमय करून टाकले. मतदानानंतर विविध सर्व्हे आणि सोशल मिडियात विचारे यांचीच मशाल पेटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. मतमोजणीच्या सुरुवातीला तसेच पोस्टल मतांमध्ये विचारे यांनी आघाडी घेतली होती.परंतु, नंतरच्या प्रत्येक फेरीगणीक म्हस्के यांची आघाडी वाढत गेल्याने भाजपच्या नियोजनबद्ध रणनितीचा तसेच शिंदेच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला फळ येऊन धनुष्य बाणाचेच 'ठाणे' यावर शिक्कामोर्तब झाले.
 
ठाणे लोकसभा मतदार संघात एकुण २५ लाख ८ हजार ७२ मतदार असुन पैकी १३ लाख ६ हजार १९४ म्हणजेच ५२.०९ टक्के इतके मतदान झाले होते.ठाणे लोकसभा क्षेत्रात मराठी मतांचा टक्का ५१ टक्के म्हणजेच १२ लाख ९५ हजार तर त्या खालोखाल उत्तरभारतीय ५ लाख ४७ हजार ९१२, मुस्लिम २ लाख ९८ हजार ८६१, गुजराती व इतर १ लाख ७४ हजार, पंजाबी व सिंधी - ४९ हजार आणि व इतर समाजाच्या मतदारांची संख्या ५० हजार एवढी आहे. या सर्वानी मोदी यांच्या आश्वासक चेहऱ्याकडे पाहुन विचारेना चारी मुंड्या चीत करीत म्हस्के यांच्या गळ्यात विजयमाला घातली.
 
म्हस्केंची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर सुरुवातीला नवी मुंबई , ठाणे आणि मिरा भाईंदर मधील भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. यावर प्रारंभी आ.संजय केळकर तसेच आ. निरंजन डावखरे यांनी सावरत कार्यकर्त्याची समजुत काढली.तर, अंतिम टप्यात स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बैठक घेऊन डॅमेज कंट्रोल केल्याने भाजप नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी मतदारसंघ पिंजुन काढत म्हस्के यांचा विजय सूकर केला. विजयानंतर याची जाहिर कबुली देताना म्हस्के यांनीही हा नरेंद्र मोदींचा करिष्मा असल्याचे सांगितले.
 
विद्यार्थी सेना, शाखाप्रमुख, नगरसेवक ते आता खासदार अशी वाटचाल करणाऱ्या खा. नरेश म्हस्के यांना आता स्वतःला बदलुन स्थानिक राजकारणा बाहेर पडुन देशाच्या विकासात ठाण्याचे योगदान देण्यासाठी झटावे लागणार आहे.दरम्यान, म्हस्के यांच्या विजयामुळे आगामी निवडणुकीत महायुतीला बळ मिळणार आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धारावीमधील मुले शाळा का सोडतात? गरिबी आणि जागरूकतेचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांची गळती

धारावीमधील मुले शाळा का सोडतात? गरिबी आणि जागरूकतेचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांची गळती

भारतामधील सर्वाधिक साक्षर झोपडपट्टीपैकी एक असलेल्या धारावीत शालेय विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचे आव्हान आहे. राज्य शासन आणि विविध स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील असताना गरिबी, असुरक्षित वातावरण, खराब आरोग्य आणि शिक्षणाविषयी जागरूकतेचा अभाव यामुळे अनेक मुले वेळेपूर्वीच शिक्षणव्यवस्थेच्या बाहेर पडत आहेत. “या शैक्षणिक वर्षातच, १०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमधून शाळा सोडली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे,” असे गांधी मेमोरियल शाळेचे मुख्याध्यापक जे. चेल्लादुराई यांनी सांगितले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121