सर्वसमावेशक, सुलभ, सहभागपूर्ण निवडणुका...

    09-May-2024
Total Views |
a 
 
निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव. पण, कुठल्याही उत्सवात ज्याप्रमाणे लोकसहभाग महत्त्वाचा, तसाच हा लोकशाहीचा उत्सवदेखील मतदारांच्या सहभागाविषयी अपूर्णच. त्यानिमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वसमावेशक, सुलभ, सहभागपूर्ण निवडणुकांसाठीचे बहुमूल्य योगदान आणि मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारा हा विशेष लेख...
 
२० मे हा पाचव्या टप्प्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा मतदानाचा दिवस. हे मतदान मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, दिंडोरी, धुळे, नाशिक या जिल्ह्यात पार पडणार आहे. आपण सर्वांनी निश्चितच हा दिवस मतदानासाठी राखून ठेवला असेलच, यात शंका नाही. भारतीय लोकशाही आजही भारतीय उपखंडातील इतर देशांतील लोकशाहीच्या तुलनेत यशस्वी ठरली आहे. याला कारण म्हणजे, भारतीय संविधानातील तरतुदी व त्यानुसार निःपक्षपातीपणे व भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सक्षम भारत निवडणूक आयोग. जो आपली जबाबदारी अतिशय पारदर्शक पद्धतीने, योग्य रीतीने पार पाडतो आणि तेवढेच महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही-आम्ही जागरूक मतदारही. जे कोणत्याही आमिष वा प्रलोभनास बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजावतात.
 
तू देश का मतदार हैं
तू लोकतंत्र का आधार हैं
ये चुनाव का पर्व हैं
तू मतदाता देश का गर्व हैं
 
भारतीय संविधानाच्या ‘भाग १५ कलम ३२४’ नुसार मतदारयादी तयार करणे व निवडणुका भयमुक्त व सर्वसमावेशकपणे घेण्यासाठी अधिकार व तशी शक्ती प्रदान करत भारत निवडणूक आयोग या स्वतंत्र सर्वोच्च संविधानिक संस्थेची निर्मिती केली. ‘कलम ३२५’ नुसार कोणत्याही जात, धर्म, लिंग, वंश आदी कारणांमुळे कोणासही मतदार होण्यापासून वंचित ठेवता येणार नसल्याचे नमूद करून ‘कलम ३२६’ नुसार प्रौढ मताधिकार प्रदान केला आणि दि. २५ जानेवारी १९५० रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने १९५१ पासून निवडणूक घेण्यास सुरुवात केली व भारतीय लोकशाही अधिकाधिक मजबूत करण्यासाठी विविध संरचनात्मक ध्येय-धोरणे आखत त्यांची अंमलबजावणी केली. यात प्रामुख्याने म्हणजे मतदारनोंदणी जेवढी महत्त्वाची तेवढीच त्यांची जागृती व निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडणे, ही जबाबदारी सांभाळली. मानवी हक्काचे जाहीरनामे प्रसिद्ध होऊन कोणतीही व्यक्ती त्यांच्या काही शारीरिक दोष वा लिंग, जात, वंश आदी भेदांमुळे मतदारनोंदणी वा निवडणूक सहभागापासून वंचित राहू नये, असे धोरण लागू झाले. निवडणूक आयोगाने आंतरराष्ट्रीय व भारतीय संविधानाने सांगितलेले तत्त्व समोर ठेवून सर्वसमावेशक सुलभ व सहभागपूर्ण निवडणुका हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तशी वाटचाल सुरू केली.
 
सर्वसमावेशक व सहभागपूर्ण निवडणुका ही संकल्पना भारतीय संविधानातील ‘कलम ३२५’चा पुनरुच्चार करणारी आहे. कोणीही लिंग, वंश, धर्म, जात वा अन्य भेदांमुळे जसा मतदारनोंदणी होण्यापासून वा मतदान करण्यापासून वंचित राहू नये, त्याचप्रमाणे उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठीही कोणतीही अडचण येता कामा नये. अर्थातच भारतीय लोकशाही ही समृद्ध व मजबूत करण्यासाठी ठेवलेले हे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने तसे प्रयत्न ’डतएएझ’ अर्थात ’डूीींशारींळल तेींशीी एर्वीलरींळेप अपव एपीेश्रश्राशपीं झीेसीरााश’च्या माध्यमातून केले जात आहेत. ज्यात महिला मतदारांची नावनोंदणी, तसेच काही वंचित घटक जसे की, तृतीयपंथी मतदार, देहविक्रय करणार्‍या महिला, दिव्यांग मतदार, बेघर मतदार यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजनही वर्षभर ’डतएएझ’च्या माध्यमातून करण्यात येते. सर्व घटकांचा मतदारयादीतील सहभाग हा समृद्ध लोकशाहीचा मूलभूत आधार ठरतो. हा उद्देश समोर ठेवून मतदारयादीत नावनोंदणी व मतदान करण्यापासून समाजाचा कोणताही घटक वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या ध्येयधोरणांत सदर सर्व समाजातील घटकांचा अभ्यास करून असा विशेष मतदार घटक शोधण्यात आला.
 
त्यात प्रामुख्याने महिला, तृतीयपंथी, विशेष महिला, दिव्यांग, बेघर, अल्पसंख्याक किंवा काही भागांतील विशिष्ट जमाती आदी मतदारनोंदणी व मतदानापासून दूर असल्याचे आढळून आले. याची कारणेही शोधण्यात आली. त्यात महिलांच्या बाबतीत लग्न होऊन स्थलांतर झाल्यामुळे किंवा मग लग्न होईपर्यंत नाव समाविष्ट न करणे, अर्थात उदासीनता हा प्रकार जास्त आढळत असल्याचे समोर आले, तर विशेष महिला (देहविक्रय करणार्‍या) तृतीयपंथी, बेघर अशा प्रवाहापासून वेगळे असण्यामुळे किंवा रहिवास पुरावा आदी कागदपत्रांअभावी नोंद होत नसणे, ही बाब समोर आली तर दिव्यांगांबाबतीत सुलभता नसणे, ही अडचण दिसून आली. त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करत काही स्वयंसेवी संस्था, शासकीय-निमशासकीय संस्था यांच्यामार्फत अशा मतदारांपर्यंत पोहोचून नावनोंदणी करणे, यांच्यासमोरील अडचणी दूर करणे, हा विचार प्राधान्याने ठेवण्यात आला. मतदार हा लोकशाहीचा बळकट आधारस्तंभ असून, सर्व स्तरांतील मतदार हे मतदारयादीत चिन्हांकित झाल्यास ती मतदारयादी समृद्ध होईल. लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी सुयोग्य ठरेल.
 
त्यामुळे ‘सर्वसमावेशक निवडणुका’ या थीमची पार्श्वभूमी ही सर्व मतदारांनी मतदारयादीत नोंदणी होणे व मतदान करणे, अशी आहे. युवा मतदार हा सुद्धा एक घटक आहे, जो मतदारनोंदणी व मतदानापासून दूर राहतो. शिक्षण पूर्ण होईपर्यंत भारतीय तरुण बर्‍याचदा मतदारनोंदणी व मतदान प्रक्रियेपासून बरेच अंतर राखून असल्याचे लक्षात येते. मग, महाविद्यालयीन व शालेय स्तरापासून हा गट निवडणूक विभागाशी जोडून ठेवण्यासाठी निवडणूक साक्षरता मंडळे, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांत स्थापन करण्यात आला व त्यांच्या जनजागृतीवर भर देण्यात आला. सर्वांचा समावेश व सर्वांची भागीदारी अर्थात सक्रिय सहभाग हा निवडणूक विभागास अपेक्षित असून, त्यामुळेच मतदार नोंद टक्का हा लोकसंख्येच्या प्रमाणात वाढेल व त्याचे प्रतिबिंब मतदानातही दिसेल. तसेच निवडून दिलेला उमेदवार हा बहुसंख्य गटाचे प्रतिनिधित्व करणारा ठरेल. त्यामुळे निश्चितच ते देशाचे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले खर्‍या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी ठरतील व लोकशाही, गणराज्य व्यवस्था उजळून निघेल, ती खुलेल ही अपेक्षा ठेवून लोकशाही मजबुतीसाठी सर्वसमावेशक निवडणूक घेण्यासाठी आयोग प्रयत्नशील असतो.
 
तसेच सुलभ निवडणुका हे निवडणूक आयोगाचे उपाययोजनात्मक धोरण स्पष्ट करणारे तत्त्व आहे. अशा सर्वसमावेशक मतदारांमध्ये जागृती करणे, त्यांना मतदान केंद्रावर पोहोचणे व मतदान करणे सुलभ जावे, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्र हा महत्त्वाचा दुसरा घटक दृष्टीसमोर ठेवून विविध उपाययोजनात्मक संरचना केली आहे. यात ८५ पेक्षा जास्त वय असणार्‍या वा दिव्यांग व्यक्तीस गृहमतदानासाठी अर्ज करून घरी बसून मतदान करण्याची सुविधाही आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच मतदान केंद्र तळ मजल्यावर असावे, त्याची आदर्श रचना, मतदान केंद्रांवर किमान मूलभूत सुविधा पुरविण्यात निवडणूक यंत्रणा आग्रही आहे. जसे की, पिण्याचे पाणी, रॅम्प व्हीलचेअर, प्रसाधनगृह, पाळणाघर याशिवाय ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार, तृतीयपंथी यांच्यासाठी स्वतंत्र रांग असणार आहे. अशा मतदारांना रांगेत न थांबता प्रतीक्षागृहातही बसता येईल. मतदान प्राधान्याने करण्याचे मार्गदर्शक तत्त्व असेल किंवा अंध-दिव्यांग मतदारांना सोबती देण्याचे प्रयोजन असेल. याशिवाय, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी वाहनांची व्यवस्था निवडणूक विभाग करते. मतदार साहाय्यता कक्ष, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील बॅलेट, ब्रेल लिपीतील व्होटर स्लीप, मतदान केंद्रांवर मग्निफाईंग ग्लास, यासोबतच ‘सक्षम’ अ‍ॅपही विशेष साहाय्यासाठी तयार केले आहे, जेणेकरून दिव्यांग मतदार यांच्याशी थेट जोडले जाता येते आणि वेळोवेळी आवश्यक ते साहाय्य करणे सुलभ होते. यापुढेही आणखीही काही सुधारणा वा बदल निवडणूक आयोगास अपेक्षित असून तशा सुविधा उपलब्ध करून मतदान करणे सहज-सुलभ-सुगम होईल, याची दक्षता निवडणूक यंत्रणा घेत असते. वर नोंदविलेले मत मतदारांची खात्री पटावी, यासाठी ‘व्हीव्हीपॅट’ या यंत्रात पडणारी चिट्ठी सात सेकंद दिसेल, अशीही सोय निवडणूक आयोगाने केली आहे.
 
सर्व मतदारांचे एकेक मत हे लोकशाहीच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून ‘एक व्यक्ती, एक मत’ हा समानतेचा धागा लोकशाहीचा भक्कम आधार आहे. चला तर मग, भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा मान राखून निवडणूक आयोगाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले मतदारयादीतील नाव आजच तपासून घेऊया व यासाठी ‘१९५०’ या क्रमांकावर ECI space EPIC पे टाकून SMS करा किंवा व्होेटर हेल्पलाईन app डाऊनलोड करून वोटरsearch करा. KYC app मधून आपल्या मतदारसंघातील उमेदवाराबद्दल सर्व माहितीही घरबसल्या जाणून घ्या. यावेळी भारत निवडणूक आयोगाने ’तखड’ अर्थात ’व्होटर इन्फॉर्मेशन स्लिप’ मतदार चिठ्ठी काढली आहे, जी आपल्या यादी भागाचे इङज अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत मिळेल. त्यावरून आपणास आपल्या मतदान केंद्राचा पत्ता, नाव, यादीतील अनुक्रमांक समजेल. परंतु, मतदान केंद्रावर जाताना आपले मतदार ओळखपत्र किंवा आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, मनरेगा जॉबकार्ड आदी १२२ पुराव्यांपैकी एक ज्यावर आपला फोटो असेल, असा पुरावा ओळख पटविण्यासाठी सोबत नेणे गरजेचे आहे.
 
दि. २० मे रोजी सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येईल. आपणास ठाऊक आहे की, लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपले एक मतही योग्य उमेदवार निवडून येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. लोकशाहीतील आपला आवाज अधिक बुलंद करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. नक्कीच मला विश्वास आहे की, आपण सर्व सुजाण नागरिक मतदानाचा हक्क बजावाल. उज्ज्वल भारतीय लोकशाहीचे साक्षीदार व्हाल. ‘माझे मत माझा स्वाभिमान‘ यानुसार, लोकशाहीवर निष्ठा ठेवून मतदान करण्याची शपथ घेऊया. भारतीय लोकशाही अधिकाधिक सशक्त आणि समृद्ध करूया. विविध राष्ट्रीय उत्सवांप्रमाणे निवडणुकांचा हा उत्सवही आपण सर्वजण मिळून मतदान करून देशासाठी अभिमान वाढविणारा ठरवूया.
बोटावरील मतदानाची शाई
प्रजासत्ताक राष्ट्राचा गौरव वाढवी
 
लक्षात ठेवा, दि. २० मे रोजी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावा आणि भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडून लोकशाहीतील आपला सहभाग अवश्य वाढवा, ही विनंती.
-स्नेहलता स्वामी
(लेखिका अंधेरीच्या तहसीलदार आहेत.)