वेदांतचे बदललेले ब्लड सँपल कुणाचे? चौकशी समितीच्या अहवालात मोठी माहिती उघड
30-May-2024
Total Views | 194
मुंबई : ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड सँपल बदलण्यात आले होते. हे बदलण्यात आलेले ब्लड सँपल नेमके कुणाचे याबाबतचा तपास सुरु असताना आता मोठी माहिती पुढे आली आहे. आरोपी वेदांतचे बदललेले ब्लड सँपल हे त्याच्या आईचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ससून रुग्णालयातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालात अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी बदललेले ब्लड सँपल एका महिलेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हे ब्लड सँपल आरोपी वेदांतची आई शिवानी अग्रवाल यांचे आहे, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुलाला वाचवण्यासाठी पैसे देऊन ब्लड सँपल बदल्यामुळे आता आरोपी वेदांतच्या आईवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे या प्रकरणात वेदांतचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल पोलिस कोठडीत असताना आता त्याच्या आईवरही अटकेची टांगती तलवार आहे. याबाबतच्या तपासासाठी शिवानी अग्रवाल यांचे ब्लड सँपल घेणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.