राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की, असलेल्यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं?

अमोल मिटकरींचा शरद पवारांना सवाल

    19-May-2024
Total Views |
 
Sharad Pawar
 
मुंबई : २००४ मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार नव्हता की, असलेल्या उमेदवाराला तुम्हाला मुख्यमंत्री करायचं नव्हतं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी शरद पवारांनी केला आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आलेले असतानाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसल्याने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. यावरून आता अमोल मिटकरींनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पवारांना सवाल केला.
 
अमोल मिटकरी म्हणाले की, "पवार साहेबांनी दिलेल्या मुलाखतीतून अनेक प्रश्न निर्माण होतात. २००४ च्या निवडणूकीमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळी तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी कोणताच उमेदवार नव्हता की, तुम्हाला राष्ट्रवादीचा करायचाच नव्हता?"
 
हे वाचलंत का? -  त्यावेळी भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर...; शरद पवारांचं विधान
 
"२००४ मध्ये राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर भूजबळ, अजितदादा यासारखे अनेक लोक मुख्यमंत्रीपदासाठी योग्य होते. त्यामुळे २००४ ला राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की, असलेल्या उमेदवाराला साहेबांना मुख्यमंत्री करायचा नव्हता. १९७८ साली मुख्यमंत्री होण्यासाठी अगदी सरकार पाडण्याच्या भूमिका कुणी घेतल्या?" असा सवाल त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रावर पृथ्वीराज चव्हाण नावाचे मुख्यमंत्री लादल्या गेले. यालाही साहेबांनी विरोध केला नाही. महाविकास आघाडीच्या काळात दोन्ही सभागृहांचा अनुभव नसलेले उद्धव ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कुणी पुढाकार घेतला होता? जोपर्यंत सुप्रीयाताई राजकारणात नसतील तोपर्यंत कुणीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, असं तुमच्या मनात होतं का? त्यामुळे या सर्व गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत," असेही ते म्हणाले.