मसाला कंपन्या एमडीएच, एवरेस्ट पुन्हा एकदा अडचणीत आता न्यूझीलंडचा आक्षेप

आता न्यूझीलंड फूड सेफ्टी विभाग चौकशी करणार

    15-May-2024
Total Views |

Masala
 
 
मुंबई: आता मसाला कंपन्या एमडीएच, एव्हरेस्ट पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. जागतिक स्तरावर या कंपन्या रडारवर आल्या असताना पुन्हा एकदा न्यूझीलंड देशाने मसाला भेसळ प्रकरणी या मसाल्यांची चौकशी करण्याचे ठरवले.आंतरराष्ट्रीय स्तरावरील अडचणीत वाढ होत असताना न्यूझीलंड देशाने मसाल्यातील घातक पदार्थांवर आक्षेप घेत याबद्दल सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
 
याबद्दल बोलताना, न्यूझीलंड फूड सेफ्टी विभागाने सांगितले,'जागतिक स्तरावर ब्रँड्ससाठी जारी केलेल्या रिकॉलची माहिती होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी हाँगकाँगने या मसाल्याच्या विक्रीवर विशेषतः या ब्रँडवर बंदी घातल्यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांनीही मसाल्याची विक्री थांबवत याप्रकरणी चौकशी सुरू केली होती. जागतिक पातळीवर मसाल्याचा मुद्दा उचलला गेला आहे. मसाल्यात इथिलिन ऑक्साईडचे प्रमाण मर्यादेहून अधिक असल्याचा दावा इतर देशातील अन्न नियामक मंडळानी केला होता. मात्र यावर एमडीएच कंपनीने हा दावा फेटाळून लावला होता. या देशांनी आरोप केल्याप्रमाणे या इथिलिन ऑक्साईडच्या सेवनामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.
 
याविषयी अधिक माहिती देताना, 'इथिलीन ऑक्साईड हे मानवांमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे रसायन आहे,आणि न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये अन्न निर्जंतुकीकरणासाठी त्याचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आला आहे. न्यूझीलंडमध्ये MDH आणि एव्हरेस्ट मसाले देखील उपलब्ध असल्याने, आम्ही या समस्येकडे लक्ष देत आहोत' असे जेनी बिशप,नियामकाचे कार्यवाहक उपमहासंचालक म्हणाले आहेत.
 
भारतातील अन्न नियामक मंडळानी कंपनीच्या देशांतर्गत उत्पादनाची चौकशी सुरू केली असुन कंपनीच्या कारखान्यांची पाहणीही केली आहे. मात्र त्यांनी अंतिम निरिक्षण प्रसारमाध्यमांसमोर मांडलेले नाही.