झारखंडमध्ये वर्चस्वासाठी भाजपची कडवी झुंज...

    11-May-2024
Total Views |
Lok Sabha Elections 2024 and Jharkhand State

ज्या राज्यांमध्ये गेल्या वेळेसारखी कामगिरी करण्यासाठी भाजपला विशेष प्रयत्न करावे लागत आहेत, त्यात झारखंडचा समावेश होतो. सध्या तरी झारखंडमधील बहुसंख्य जागांवर भाजपला विजय मिळेल, असे चित्र असले, तरी गेल्यावेळेइतक्या जागी भाजपला विजय मिळेल का, ते सांगणे सध्या तरी अवघड आहे.

उत्तर भारतात भाजपच्या बाजूने मोठा कल असला, तरी काही राज्यांमध्ये 2019 मधील निवडणुकांच्या तुलनेत भाजपला आपल्या जागा राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. अशा राज्यांमध्ये झारखंडचा समावेश होतो. झारखंडमध्ये लोकसभेच्या 14 जागा असून 2019 मध्ये भाजपने तब्बल 51.6 टक्के मते मिळवून 11 जागांवर विजय मिळविला होता. ‘एजेएसयू’, ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला होता. यंदा भाजपने ‘एजेएसयू’शी युती केली आहे. त्या पक्षाला सोडलेली एक जागा वगळता, बाकी सर्व जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत. यंदा सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक घेतली जात असली, तरी पहिल्या तीन टप्प्यांमध्ये झारखंडमध्ये मतदान घेतले गेले नाही. आता दि. 13 मेपासून चार टप्प्यांमध्ये झारखंडच्या 14 जागांवर मतदान घेतले जाईल.

पहिल्या टप्प्यांत खुंटी, सिंघभूम आणि लोहारडगा या तीन अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांमध्ये निवडणूक घेतली जाईल. यापैकी खुंटी आणि लोहारडगा या दोन जागा 2019 मध्ये भाजपने जिंकल्या असल्या, तरी सिंघभूमची जागा काँग्रेसने जिंकली होती. खुंटीमध्ये भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांचा केवळ 1,445 इतक्या निसटत्या बहुमताने विजय झाला होता. तसेच लोहारडगामध्येही केवळ 10 हजार 363 मतांनी भाजपने विजय मिळविला होता. उलट सिंघभूमची जागा काँग्रेसने 72 हजार 155 इतक्या फरकाने जिंकली होती. आताही अर्जुन मुंडा यांना विजयासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. खुंटी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी दोनच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत, तर चार जागा काँग्रेसकडे आहेत. आदिवासीबहुल मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसत असून बिगर-आदिवासी आणि शहरी मतदारांमध्ये अर्जुन मुंडा लोकप्रिय आहेत. तसेच त्यांना कुर्मी समाजाचाही पाठिंबा लाभला आहे. मात्र मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही, ही सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे.

सिंघभूममध्ये यावेळी वेगळी स्थिती आहे. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार गीता कोडा असून त्या 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या त्या पत्नी. यावेळी मात्र त्या भाजपतर्फे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात ‘झारखंड मुक्ती मोर्चा’चे जोबा मांझी उभे आहेत. ते मनोहरपूरचे विद्यमान आमदार असून हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते. या जागेवर पारंपरिकदृष्ट्या भाजप आणि काँग्रेस यांच्यातच लढत होत असे. मात्र मधू कोडा यांनी 2009 मध्ये येथून अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक जिंकल्यापासून कोडा परिवार हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. कोडा यांना ‘हो’ या आदिवासी समाजाचा भक्कम पाठिंबा मिळतो. या मतदारसंघात ‘हो’ समाजाच्या मतदारांचे प्रमाण 60 ते 70 टक्के आहे, असे सांगितले जाते. आता त्यांच्या पत्नी गीता यांनाही त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

लोहारडगामध्ये यावेळी तिहेरी लढत असून झामुमोचे प्रमुख नेते व तीनदा आमदार झालेले चामरा लिंडा हे बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोहारडगामध्ये पाच विधानसभा मतदारसंघ येतात. ते सर्व काँग्रेस व झामुमो यांच्याकडेच आहेत. 2019 मध्ये भाजपच्या सुदर्शन भगत यांनी या मतदारसंघात विजय मिळविला होता. त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार सुखदेव भगत यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता. यावेळीही काँग्रेसने सुखदेव भगत यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. भाजपने मात्र यावेळी सुदर्शन भगत यांच्याजागी आपले राज्यसभा सदस्य समीर ओराओंन यांना उभे केले आहे. ओराओंन हे भाजपच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.लिंडा यांच्या बंडखोरीचा लाभ भाजपला होईल, असे म्हटले जाते. लिंडा यांचा या मतदारसंघात चांगला जम बसलेला आहे. त्यांनी आदिवासींसाठी घटनेत सरमा कोड मिळावा, यासाठी आंदोलन उभे केले होते.

जे आदिवासी निसर्गपूजक आहेत, त्यांना स्वतंत्र सरणा धर्माचा दर्जा दिला जावा, अशी त्यांची मागणी आहे. 2009 मध्ये त्यांनी तब्बल एक लाख 18 हजार मते मिळवून काँग्रेसचे उमेदवार रामेश्वर ओराओंन यांना तिसर्‍या स्थानी फेकले होते. त्यांनी या मतदारसंघात अनेक ‘यूथ क्लब’ स्थापन करून आपला मतदारांचा पाया बनविला आहे. 2014 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती, तेव्हाही त्यांना तब्बल 96 हजार मते मिळाली होती. त्यामुळे आता ते किती मते मिळवितात, त्यावर भाजपचा विजय अवलंबून राहील, असे दिसते.काँग्रेसचे उमेदवार सुखदेव भगत यांच्यापुढे फक्त लिंडा यांचेच आव्हान नाही, कारण त्यांना पक्षांतर्गत गटबाजीशीही झुंजावे लागत आहे. कारण, काँग्रेसचे माजी खासदार रामेश्वर ओराओंन हे नाराज असून त्यांनी सुखदेव भगत यांच्या प्रचारात भाग घेतलेला नाही.

ओराओंन यांना मंदार विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार शिल्पी नेहा तिर्के यांनीही पाठिंबा दिला आहे. ही स्थिती बघितल्यावर काँग्रेसचे पक्ष प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे की, भगत यांना किती मते पडतात, त्यावर आगामी विधानसभा निवडणुकीतील तिकीट कोणाला द्यायचे ते अवलंबून राहील.झारखंडमध्ये बहुसंख्य जागांवर भाजपचा विजय होईल, असे सध्या तरी चित्र असले, तरी गेल्या निवडणुकीसारखी कामगिरी साध्य करणे हेही सोपे नाही, असे दिसते. पहिल्या टप्प्यांत मतदानाची टक्केवारी कसी आहे, त्यावरून पुढील फेरींचा अंदाज येईल. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या रोड शोजना मिळालेल्या उदंड पाठिंब्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
 
 
- राहुल बोरगांवकर