माधुरी दीक्षितलाही भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चरित्रपट, प्रेक्षकांना केले चित्रपट पाहाण्याचे आवाहन

    10-May-2024
Total Views |

madhuri   
 
 
मुंबई : सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना ठाऊक आहे, परंतु त्यांचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. अनेक चढउतार यादरम्यान आले. त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Swargandharva Sudhir Phadke) हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी त्याला पसंती दर्शवली आहे. परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. कलाकारांचे, दिग्दर्शनाचे कौतुक होत असतानाच आता बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) , सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoanakr) , सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgoanakr) यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले आहे.
 
माधुरी दीक्षित म्हणाली की, “ मराठी चित्रपटविश्वात ज्यांच्या भावपूर्ण स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे त्या सुधीर फडके यांचं आयुष्य स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटातून आपण अनुभवत आहोत. १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. सौरभ गाडगीळ यांची निर्मिती असलेला या संगीतमय चित्रपट नक्की पाहा”, असे आवाहन माधुरीने प्रेक्षकांना केले आहे.
 
तर सुप्रिया पिळगांवकर म्हणतात, “ स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट पाहिला. आत्म्याला बल देणारा, आत्मा तृप्त करणारा असा हा चित्रपट आहे. प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा”, असे त्या म्हणाल्या. तर सचिन पिळगांवकर म्हणाले, “बाबूजी म्हणजे आपले लाडके सुधीर फडके. माझ्या आयुष्यात आलेल्या या अविस्मरणीय व्यक्तिचा सहवास मला लाभला. त्यांच्या जीवनावर बनलेला स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट मी पाहिला आणि मला भरुन आलं. त्यात दाखवलेले अनेक प्रसंग मी पाहिले आहेत. चित्रपटातील गीतरामायणाचं गाणं आकाशवाणीत रेकॉर्ड होतानाचा प्रसंग पाहताना भावूक झालो. आणि मी सर्वांना आवाहन करतो की हा चित्रपट केवळ एकादच बनू शकतो. त्यामुळे तो चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा”.
 
याबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, '' मनाला खूप समाधान मिळतेय, आमच्या सर्वांची मेहनत फळाला आली आहे. आज प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीकडून चित्रपटाचे, कलाकारांचे इतके कौतुक होत आहे. चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे मेसेज, फोन येत आहेत. एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोठी कौतुकाची थाप आहे. यासाठी सर्वांचे मनापासून आभार.''