शहाणे करूनी सोडावे अवघे जन

    04-Apr-2024
Total Views | 104
Gargi Geedh

कचर्‍यासारख्या सहज दुर्लक्ष होणार्‍या विषयाचे गांभीर्य ओळखून, कचरानिर्मिती कमी करण्यासाठी, जनसाक्षरतेचा ध्यास घेतलेल्या गार्गी गीध यांच्याविषयी...

कचरा ही आपल्या जीवनात तशी फारसे महत्त्व नसणारी गोष्ट. बरेचदा तर कचरा टाकल्याने अस्वच्छता, दुर्गंधी, अनारोग्य निर्माण होते, हेच अनेकांना लक्षात येत नाही. आपल्या वाईट सवयींमुळे सरकारला ’स्वच्छ भारत अभियान’ असो किंवा ’स्वच्छ मुंबई’ अशा अनेक उपक्रमांतून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करावे लागते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही करावे लागतात. तरी हल्ली पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयीच्या प्रचार-प्रसारामुळे कचर्‍याचे वर्गीकरण, पुनर्वापर यांबाबत बर्‍यापैकी जनजागृती झालेली दिसते. पण, तरीही अजून लांबचा टप्पा गाठायचा आहेच. त्यासाठी कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व ओळखून, त्यासाठी प्रत्यक्ष काम करणार्‍यांची संख्याही अलीकडे वाढलेली दिसते. गार्गी गीध या त्यापैकीच एक.एका मध्यमवर्गीय कुटुंबात गार्गी यांचा जन्म झाला. त्यांनी माटुंग्याच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात मराठी साहित्यशास्त्र विषयात पदवी संपादन केली. पुढे जाऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी त्यात ’एमए’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना, अनेकदा सुट्टीच्या दिवशी त्या प्राणी, पक्ष्यांची छायाचित्रे काढण्याचा छंद जोपासत होत्या. त्यातूनच निसर्गाविषयीची त्यांची ओढ दृढ होत गेली.

मात्र, कचरा या विषयाकडे त्यांचे लक्ष खर्‍या अर्थाने वळले, ते ‘कोविड’ महामारीच्या काळात. या काळात परिस्थिती इतकी बिकट होती की, घरातील कचरा नेण्यासाठीही कोणी येत नव्हते. त्यावेळी कचरा या समस्येकडे गार्गी यांचे लक्ष वेधले गेले. सायकलिंग करताना, अनेकदा मुंबईतल्या डम्पिंग ग्राऊंडचे डोंगर त्यांच्या नजरेस पडत होते. ते दृश्य पाहून विचलित होत, यासाठी काही तरी करण्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यासाठी गार्गी यांनी कचरा व्यवस्थापन या विषयाची माहिती घेण्यास सुरुवात केली. ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण ही कचरा व्यवस्थापनाची प्राथमिक पायरी असल्याचे त्या सांगतात. ”कचरा व्यवस्थापन या विषयाचा आवाका एवढ्यावरच मर्यादित नाही. कचर्‍याच्या समस्येवरील रामबाण उपाय हा कमीत कमी कचर्‍याची निर्मिती करणे हाच असून, त्यासाठी वस्तूंचा पुनर्वापर प्रयत्नपूर्वक वाढला पाहिजे,” असे गार्गी सांगतात. आज समुद्र किनारे स्वच्छ केले जातात किंवा अनेक स्वच्छता मोहिमा आयोजित केल्या जातात. हे उपाय योग्य असले, तरीही त्यातून शाश्वत समाधान मिळत नसल्याचे देखील त्या नमूद करतात. भारतीयांना फार पूर्वीपासूनच वस्तूंचा पुन्हा वापर करण्याची सवय होती.पण, हल्लीच्या ’यूज अ‍ॅण्ड थ्रो’च्या जमान्यात भारतीय आपली ही सवय विसरले असल्याची खंतही गार्गी यांनी व्यक्त केली. त्यामुळे याच सवयीची आठवण भारतीयांना करून देणार असल्याचा निधार्र्र त्यांनी व्यक्त केला.

यासाठी कचरा या विषयावर फक्त उपदेश न देता ’आधी केले, मग सांगितले’ या न्यायानुसार कमीत कमी कचरानिर्मितीची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासूनच केली. प्लास्टिकची रद्दी तयार करण्यापासून, कंपोस्ट निर्मितीसुद्धा त्यांनी त्यांच्या ठाण्यातील घरीच केली. हा उपक्रम त्यांनी स्वतःपुरता मर्यादित न ठेवता, त्यात आई-वडिलांना आणि लग्नानंतर सासरच्या मंडळींनाही सहभागी करून घेतले. आपले सगळेच कुटुंबीय आपल्या कामाविषयी अभिमान बाळगतात, याचे एक समाधान त्यांना वाटते. एखाद्या गोष्टीविषयी अज्ञान असल्यानेच, लोक त्यापासून लांब राहतात. जर आपण त्यांना ती गोष्ट नीट समजावून सांगितली व जबाबदारी दिली की, आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात, असा गार्गी यांचा विश्वास आहे.गार्गी सध्या ‘ग्रीन वर्क्स ट्रस्ट’ या संस्थेत ’कचरा व्यवस्थापन’ या विषयासाठी शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ’जे जे काही आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीप्रमाणे त्या आज सोप्या पद्धतीने कचरानिर्मिती कशी कमी करता येईल, याचा प्रसार करत आहेत. ”भारतात घरात खर्‍या अर्थाने सत्ताधारी या गृहिणी असतात.

 घरात त्यामुळे कचरानिर्मिती कमी करण्यासाठी, त्या ’कचरा नको गं बाई’ हा कोर्स घेतात. त्यात कचरा व्यवस्थापन ते पुनर्वापर या सगळ्यांचे फक्त शिक्षणच नाही, तर व्यवस्थापनासाठी मार्गदर्शनदेखील केले जाते,” असे त्यांनी सांगितले. लहान मुलांसाठीही ’गेम अ‍ॅाफ ट्रॅश’ हा कोर्स चालू केला आहे. यामध्ये खेळाच्या माध्यमातून लहान मुलांना कचरा व्यवस्थापन ते कंपोस्ट निर्मिती शिकवली जाते.आपण निर्सगाला जे देतो, त्याची परतफेड निसर्ग अनेक पटींनी करत असतो. मानवाने या निसर्गात अतिप्रमाणात कचरा टाकला. तो फिरून आत परत त्याच्याकडे येत आहे. तसेच कचर्‍याचा पुनर्वापर ही एक मोठी अर्थव्यवस्था असून, त्याकडे भारतीयांचे फार दुर्लक्ष झाले असल्याचे त्या सांगतात. पण, गेले काही वर्षं या विषयावर काम करणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे देखील त्या नमूद करतात.कचरा ही एक जागतिक समस्या असून, तिने सध्या गंभीर स्वरूप धारण केले आहे. प्लास्टिकमुळे कर्करोगापासून प्रजनन संस्थेचे विकार होण्याचा धोका असतो. या सगळ्यामुळेच या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळेच एकांगाने मानव प्रजातीच्या रक्षणासाठी काम करणार्‍या गार्गी यांच्या सारख्या स्वच्छतादूतांचे महत्त्वही वाढत आहे. गार्गी गीध यांना पुढील वाटचालीसाठी दै.’मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!


कौस्तुभ वीरकर

(अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६८४६२९२३/९३२४१६७६६८)



अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121