नवी मुंबई : पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे.
सोमवार,दि.२८ रोजी पनवेल बस डेपो येथे पाच नवीन बसेसचे लोकार्पण आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लांबपल्ल्यासाठी पाच नवीन बसेस सेवेत दाखल झाल्या व त्याचा शुभारंभ आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आमदार विक्रांत पाटील बोलत होते.
बीओटी तत्वावर या बस डेपोच्या विकासाचे काम हे एका कंत्राटदाराला दिले आहे. परंतु सुरुवातीपासूनच या कंत्राटदाराने कामामध्ये दिरंगाई केली आहे. आता काही तांत्रिक अडचणीमुळेही हा प्रकल्प धिम्या गतीने सुरू आहे. बीओटी तत्वावर जर हा प्रकल्प पूर्ण करणे शक्य होत नसेल व त्यामध्ये प्रकल्पाच्या उंचीचे कारण दाखवत पर्यावरण खात्याकडून काही अडचणी असतील, तर या प्रकल्पाचे स्वरूप तात्काळ बदलावे. राज्य शासनाकडून या प्रकल्पाला पुढे नेण्याकरिता प्रयत्न करावे, जेणेकरून प्रकल्पाच्या उंचीचा प्रश्न हा निकाली निघू शकेल व प्रकल्प पूर्ण होऊ शकेल, अशी मागणीही विक्रांत पाटील यांनी केली आहे.