मानवतेचा विकास म्हणजे माणसाचा विकास : डॉ. मोहनजी भागवत

    04-Apr-2024
Total Views |

Mohanji Bhagwat - नर्मदांचल सुमंगल संवाद

भोपाळ :
"आर्थिक संसाधने आणि अधिकार मिळवणे याला विकास म्हणत नाही. मानवतेचा विकास म्हणजे माणसाचा विकास.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Mohanji Bhagwat Bhopal) यांनी केले.

मध्य भारत प्रांतातील बाणखेडी येथे भाऊसाहेब भुस्कुटे स्मृति लोक न्यास, गोविंद नगर बाणखेडीच्या वतीने आयोजित 'नर्मदांचल सुमंगल संवाद' मध्ये सरसंघचालकांनी विकासाची भारतीय संकल्पना स्पष्ट केली. यावेळी ग्रामीण विकास आणि पर्यावरण विषयक १०० निवडक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांनी आणि रा.स्व.संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी सर्वांगीण ग्रामविकास, गोसंवर्धन, पाणी आणि पर्यावरण यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांकडून होत असलेल्या कार्याचा आढावा घेतला.

हे वाचलंत का? : आपले आचरण हीच आपली ओळख आहे : डॉ. मोहनजी भागवत

ग्रामविकास आणि पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सरसंघचालक म्हणाले की, आपल्या देशात हजारो वर्षांपासून शेती सुरू आहे, पण जमीन नापीक झाली नाही. आजच्या व्यवस्थेने मात्र अनेक देशांतील शेती उद्ध्वस्त केली आहे. एखाद्या व्यक्तीचा आनंद कुटुंबाच्या आनंदातून येतो आणि कुटुंबाचा आनंद गावाच्या आनंदातून येतो असे आपल्या संस्कृतीने सांगितले आहे. त्याचप्रमाणे एखादे गाव जिल्ह्याच्या आनंदामुळे आणि जिल्हा हा राष्ट्राच्या आनंदामुळे सुखी असतो. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या परंपरांचे महत्त्व समजून घेऊन समाजाची सकारात्मक ऊर्जा घेऊन ग्रामविकास व पर्यावरणाचे काम केले पाहिजे. दरम्यान भैय्याजी जोशी यांनी नदी, जमीन, झाडे यांच्याशी संवाद साधण्याची गरज व्यक्त करत संघाव्यतिरिक्त इतर समाजातील सज्जनांकडून सुरू असलेल्या चांगल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

‘नर्मदांचल सुमंगल संवाद’ मध्ये विविध सामाजिक संस्थांनी आपल्या सामाजिक कार्याची माहिती सादर केली. भाऊसाहेब भुस्कुटे ट्रस्टच्यावतीने संस्कृती, शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, सेंद्रिय शेती, पर्यावरण, गोसेवा व संवर्धन आदी क्षेत्रात होत असलेल्या कार्याची व 'मेरा गाव मेरा तीर्थ' योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. राजगड जिल्ह्यातील झिरी गाव, बासोदा जिल्ह्यातील झुकरजोगी आणि दतिया जिल्ह्यातील भरसुला या प्रांतातील आदर्श प्रभात गावांच्या कामांची माहितीही सरसंघचालकांसमोर मांडण्यात आली. यासोबतच सामाजिक समिती हरदा आणि सिवनी माळवा येथील पर्यावरण सेंद्रिय शेती समितीने प्रभावी गायी संवर्धन, वृक्ष लागवड, स्वयंरोजगार, सेंद्रिय शेती आणि सांस्कृतिक पैलूंवर त्यांच्या स्तरावर सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. त्याचबरोबर 'नर्मदा समग्र' या संस्थेने नदीला सजीव मानून शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत असलेली कामे आणि आजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले प्रयत्न याविषयी व्हिडिओ सादरीकरण केले.