उद्धव ठाकरेंना शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचंय मग आदित्य का नको? - भास्कर जाधव

२०२४मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बसणार, त्यांची तयारी सुरू : भास्कर जाधव

    23-Apr-2024
Total Views |

Bhaskar Jadhav


रत्नागिरी
: भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरेंवर वाट्टेल ती टीका टीपण्णी करत आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल एकनाथ शिंदे असो वा भाजप असो त्याच गोष्टी सांगत आहेत. उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने गादीवरुन खाली खेचलं. त्यांचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरेंच्या वेदना मी पाहिल्यात आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा ४० आमदार सोडून गेले तेव्हा ५० खोके एकदम ओक्के ही घोषणा आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा दिली. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी का तयार होऊ नये हा माझा सवाल आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले. टिव्ही९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.


पुढे ते म्हणाले की, "माझी इच्छा आहे कि आदित्य ठाकरेंनी २०२२मध्ये स्वतःच्या वडिलांची खुर्ची जाताना पाहिली. २०२४मध्ये पुन्हा आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी तयारी करत असतील तर त्यांनी का होऊ नये. माझी इच्छा आहे की, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, पण उद्धव ठाकरेंना एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे तर मग आदित्य ठाकरे का नको?", असा प्रश्नही जाधव यांनी विचारला. परवाच्या भाषणात मी सांगितलं की उद्धव ठाकरेंसोबत २०२४ पर्यंत आहे. याचा अर्थ असा की २०२४ला मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांच्यासोबत रहायचे आहे.", असेही त्यांनी सांगितले.


"उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे खुर्चीवरुन खाली खेचले त्यांना पुन्हा गादीवर वाट्टेल तेवढे कष्ट उपसायला आम्ही तयार आहोत. मला काही मिळावं म्हणून मी काही केलं नाही. जे करायचे ते निस्वार्थीपणे करायचे, दिया उसका भी भला ना दिया उसका भी भला, अशा पद्धतीचा मी माणूस आहे. त्यामुळे आमच्या सारख्यांचा विचार आम्ही कधी करतच नाही," असेही ते म्हणाले.


भास्कर जाधव नाराज?

विनायक राऊतांवर भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. त्यानंतर भास्कर जाधवांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. विनायक राऊत विरुद्ध भास्कर जाधव या वादाचा अंक काही दिवसांपूर्वी कोकणाने पाहिले. पक्षश्रेष्ठीकडून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न वारंवार केला जात असला तरीही दोघांमधील विस्तव जात नसल्याचे आता दिसू लागले आहे. लोकसभा निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाही भास्कर जाधव सक्रिय सहभागी होताना कुठेही दिसत नाहीत.