लाचारीची हद्द

    21-Apr-2024
Total Views |
uddhav
 
उद्धव ठाकरे यांनी लाचारीची हद्द पूर्ण ओलांडली आहेे. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे, असे म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी केव्हा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, हे सामान्य शिवसैनिकाला कळलेही नाही. आता त्यांना आदित्यला मुख्यमंत्री करायचे आहे. पण या खोट्या राजकारणात नेमके कोण अडकतय हेच त्यांना समजत नाही आहे.
 
एकदा खोटे बोलले की वारंवार खोटे बोलावे लागते. त्यातूनच खोटे उघडकीस येते. उद्धव ठाकरे हे थोडे भ्रमिष्ट झाले असून, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करून, मी दिल्लीला जाईन, असे ते म्हणताहेत. त्यांना वेड लागले असेल, पण मला तर वेड लागलेले नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शनिवार, दि. २० एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांनी धारावी येथील सभेत बोलताना, फडणवीस यांनी २०१९ मध्ये सत्तावाटपाचा भाग म्हणून, आदित्य याला मुख्यमंत्री म्हणून तयार करतील, असे सांगितले असल्याचा दावा केला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, महाराष्ट्राचा महानालायक कोण, अशी स्पर्धा घेतली तर त्यात उद्धव ठाकरे निर्विवादपणे पहिले येतील, अशा शब्दांत त्यांना फटकारले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारच्या कारभाराचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी जी बेताल बडबड केली आहे, त्याचा अर्थ म्हणूनच समजून घेणे नितांत गरजेचे. उद्धव ठाकरे हे आपल्या कर्तृत्वाने मुख्यमंत्री झालेले नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठीच त्यांनी मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे, असे पालुपद लावले. अमित शाह यांनी बंद खोलीत न दिलेल्या वचनांचा दाखला त्यांनी त्यासाठी दिला. भाजप खोटे बोलत आहे, असे निलाजरेपणाने सांगत त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी केली. त्यासाठी सोनिया गांधी यांच्यासमोर ते झुकले. ज्या दिवशी मला सत्तेसाठी काँग्रेससोबत जावे लागेल, त्यादिवशी मी माझे दुकान बंद केले असेल, असे तेजस्वी उद्गार ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते, त्यांच्याच पुत्राने काँग्रेसचरणी आपल्या निष्ठा वाहिली होती.
 
आताही उद्धव ठाकरे यांच्या विधानातून, त्यांचा खोटेपणा स्पष्ट झालेला आहे. आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो, असा शब्द फडणवीस यांनी दिला होता, असे ते म्हणतात. म्हणजेच आदित्य हाच त्यांच्या मनातील सामान्य शिवसैनिक होता, हेच त्यांनी जाहीर सभेत सांगितले आहे. जनतेचा विश्वासघात करून, जे पद उद्धव यांनी पदरात पाडून घेतले, त्या पदालाही त्यांनी न्याय दिला नाही. महाराष्ट्रातील जनतेशी त्यांनी केलेली ही प्रतारणाच होती. कोणताही प्रशासकीय अनुभव नसल्यानेच, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी कामकाज पाहिले. साथरोगाचे संकट महाराष्ट्रात यांच्याच नाकर्तेपणामुळे गडद झाले. अशा वेळीही उद्धव मंत्रालयात केवळ दोनदा आले. पालघर येथे साधूंची जमावाने निघृणपणे हत्या केली. सचिन वाझेसारखा उद्धव यांनीच नेमलेला पोलीस अधिकारी १०० कोटींची वसुली गृहमंत्र्याच्या नावाखाली करत मुंबईत अलिशान गाड्यांतून फिरत होता. अंबानीसारख्या उद्योगपतींच्या घराखाली स्फोटके लावण्यात आली, त्यातील प्रमुख साक्षीदाराची हत्या करण्यात आली, विरोधात बोलणार्‍या कंगना रानावत हिच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला, तर अर्णब गोस्वामीसारख्या संपादकाला दहशतवाद्यासारखे अटक करण्यात आले. यांच्या पापांची यादी खूप मोठी आहे.
 
ज्या शरद पवारांच्या साथीने त्यांनी सत्ता उपभोगण्यासाठी जनतेचा विश्वासघात केला, त्या शरद पवारांनीही त्यांच्या आत्मचरित्रात यांच्या नाकर्तेपणावर बोलत, यांना घरचाच आहेर दिला. आदित्य ज्या पोरकटपणे मंत्रिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करत होता, तेही निंदनीय असेच होते. मात्र, उद्धव स्वतः सत्तेची उब घेण्यात मग्न असल्याने, त्यांना या गोष्टी दिसतच नव्हत्या. म्हणूनच ‘बेस्ट सीएम’ असा लौकिक त्यांना पैसे देऊन मिळवावा लागला. हिंदुत्वाला यांनी जी मूठमाती दिली, ती पाहूनच एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एल्गार केला.
 
आदित्यला फडणवीस प्रशिक्षित करणार होते, म्हणजे उद्धव मुख्यमंत्री असताना, ते आदित्यला तयार करू शकत नव्हते का, असाही प्रश्न आहेच. म्हणजे स्वतःची लायकी नेमकेपणाने माहीत असल्यानेच, फडणवीस यांच्यावर त्यांनी ही जबाबदारी सोपवली होती, असे म्हणायचे का? घराणेशाहीत फक्त आणि फक्त कुटुंबाचाच विचार होतो. म्हणूनच केंद्रातील मोदी सरकार घराणेशाहीच्या विरोधात आहे. शरद पवारांनीही तेच केले. अशी ही घातक घराणेशाहीच म्हणून संपवायला हवी. ही घराणेशाही अबाधित राहावी, यासाठीच देशातील २८ विरोधी पक्ष ‘इंडी’ आघाडीच्या नावाखाली एकत्र आले आहेत. त्यांना आता कायमचे घरी बसवण्याची वेळ आली आहे.
 
उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नाकर्त्या माणसांनी जे बोलके पोपट पैसे मोजून ठेवले आहेत, ते त्यांना पंतप्रधानपदी बसवाय तयार झाले आहेत. ‘इंडी’ आघाडीचे सरकार आले, तर उद्धव हेच पंतप्रधान होतील, असा दावा हे पोपट करत आहेत. उद्धव ठाकरे हे स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री झाले असते, तर त्याचे कोणालाही काही वाईट वाटण्याचे कोणतेही कारण नव्हते. मात्र, लायकी नसताना केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले तर काय होते, तर त्याचा उद्धव ठाकरे होतो. त्यात जनतेची ससेहोलपट निष्कारण होते. मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे, तर करा. त्याच्या मेहनतीवर करा. लोकशाहीला एवढे गृहीत धरू नका. तुमच्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे, या वाक्यावर महाराष्ट्रातील जनता एकदा भूलली आहे. पुन्हा पुन्हा जनता तुमच्या चुका माफ करणार नाही. मात्र, तुम्ही तुमची वैयक्तिक इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लाचारीची हद्द गाठता आहात, हे नाकारू नका. इतकेच.