सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर सुप्रियाताईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "त्या माझ्या..."

    31-Mar-2024
Total Views |
 
Supriya Sule
 
मुंबई : बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंना तर महायूतीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. शनिवारी या दोन्ही नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली आहे.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीशी नसून माझ्यासाठी ही एक वैचारिक लढाई आहे. माझी लढाई ही भाजपच्या चुकीच्या निर्णयांविरोधात आहे. माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार असल्याने माझं राजकारण हे व्यक्तिकेंद्रित नसून वैचारिक आणि विकासाचं आहे."
 
त्या पुढे म्हणाल्या की, "भाजपला आमच्या घरातली वहिनी लागते आहे. मोठी वहिनी ही आईसमान असते. त्यामुळे आमच्या आईला भाजपला निवडणूकीत उतरवावं लागत आहे. लोकशाहीत काय निर्णय घ्यायचा हे लोकं ठरवत असतात. मी निवडणूकच नाही तर त्यानंतरची प्रक्रियादेखील गांभीर्याने घेते. सगळ्यांनी माझं काम पाहिलेलं आहे. त्यामुळे माझी ओळख काही नवीन नाही," असे त्या म्हणाल्या.
 
तसेच यावेळी पुन्हा एकदा लोकसभेची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आणि या भागाची पुन्हा लोकप्रतिनिधी होण्याची संधी द्या, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे. दरम्यान, बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना तिकीट मिळाल्याने नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे.