भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का! माजी मंत्र्याच्या सूनेचा पक्षात जाहीर प्रवेश

    30-Mar-2024
Total Views |
 
Archana Chakurkar
 
लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
 
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचा पक्षप्रवेश हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, "मागच्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकसनशील भारतापासून ते विकसित भारतापर्यंतचा प्रवास आम्ही सगळे बाहेर बसून बारकाईने बघत होतो. त्याबद्दल कुतूहल होतं. सप्टेंबर महिन्यात पारित झालेलं नारी शक्ती विधेयक हा ऐतिहासिक निर्णय होता. हे धाडसी आणि निर्णायक पाऊल बघून मी या क्षेत्रात येण्याचं धाडस केलं आहे," असे त्या म्हणाल्या.
 
हे वाचलंत का? -  "नाराज असलं म्हणून काय झालं? मी..."; अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण
 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अर्चना पाटील यांना ३० वर्षांचा सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहे. त्या थेट राजकारणात काम करत नसल्या तरी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या समवेत त्यांचा राजकारणाशी निकटचा संबंध होता. एक अतिशय प्रामाणिक, सज्जन आणि मुल्याधिष्ठीत राजकारण करणारा राजकारणी अशी शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रतिमा आहे. हाच वारसा पुढे नेण्याचं काम अर्चनाताई करु शकतात. त्यांच्या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात एक मजबूत नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे. निवडणूकीत याचा निश्चितच आम्हाला फायदा होईल, यात शंका नाही," असे ते म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, "अंबादास दानवेंशी आमचा कुठलाही संपर्क नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे कुठलीही चर्चा नाही. महाविकास आघाडी असो किंवा इंडी आघाडी असो ही फ्रेंडली फाईटच आहे. ते मित्र म्हणून भेटतात आणि वाद करुन निघून जातात," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.