बच्चू कडूंचे वादळ शमविण्याची ताकद 'सागर' बंगल्यावर - आ. नितेश राणे

    29-Mar-2024
Total Views |
Nitesh Rane Amaravati Candidate Conflict


मुंबई :     आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महायुती व मविआकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दोन्ही युतींकडून अद्याप काही जागांवर चर्चा सुरू असून संबंधित जागेचा तिढा सोडविण्यासाठी बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी अमरावतीमधील उमेदवारीबाबतच्या बच्चू कडूंच्या विरोधावर भाष्य केले आहे. 'प्रत्येक वादळ शमविण्याची ताकद सागर बंगल्यावर आहे, बच्चू कडूंचे वादळदेखील शमेल, असा विश्वास भाजप आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अमरावतीमधून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर राणांच्या विरोधात प्रहार प्रमुख बच्चू कडू व शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांनीही नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे.

शिवसेना (शिंदे गट) आनंदराव अडसूळ यांनीदेखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. तसेच, महायुतीतून बाहेर पडू असा इशारा बच्चू कडूंनी मित्रपक्षांना दिला आहे. त्याचबरोबर, नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही असे सांगतानाच राणांविरोधात उमेदवारी देण्याची तयारी प्रहारतर्फे बच्चू कडूंनी दाखवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपकडून बच्चू कडू यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात भाजपला किती यश मिळेल हे पाहणे महत्त्वाचे असेल.