काँग्रेस अध्यक्षांचा ठाकरेंना इशारा; म्हणाले, "एवढेच सांगेल की..."
27-Mar-2024
Total Views | 170
मुंबई : उबाठा गटाने आपल्या १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यापासून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. उबाठा गटाच्याविरुद्ध काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय निरुपम यांनी उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
"मी खिचडीचोर अमोल किर्तीकर यांचा प्रचार करणार नाही." अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. संजय निरुपम यांच्यासोबतचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला नसल्याची टीका केली. त्यासोबतचं काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील उबाठा गटाच्या यादीवर नाराजी व्यक्त केली आहे.
या नेत्यांसोबतच आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. त्यांनी सांगली आणि मुंबईतल्या लोकसभा जागांवर उबाठा गटाने उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विट करत उबाठा गटावर निशाणा साधला.
वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीले की, "आताच्या घडीला एवढेच सांगेन की, उबाठा गटाला सांगली लोकसभा आणि मुंबईतल्या ज्या लोकसभेच्या जागा, जिथे मित्रपक्षांमध्ये एकमत होणे अजून बाकी आहे, तिथे एकतर्फी उमेदवार जाहीर नको करायला हवे होते. मुंबईचा मुद्दा जिथे आहे, यासंदर्भात आम्ही आमची नाराजी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पुढची पावलं उचलण्यात येतील."