राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकांमध्ये जिल्हा संघचालक ते क्षेत्रसंघचालक अशा निवडणुका असतात. त्याचबरोबर निर्वाचित केंद्रीय प्रतिनिधी अ. भा. प्रतिनिधी सभेत मा. सरकार्यवाह या कार्यकारीपदाची निवड करतात. यावर्षीच्या नागपूर येथे संपन्न झालेल्या बैठकीत दि. १५-१६-१७ मार्च रोजी विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांची फेरनिवड झाली. त्यांनी पुढील तीन वर्षांसाठी केंद्रीय कार्यकारिणी घोषित केली. त्यात सहसरकार्यवाहपदावर सहा जणांची नियुक्ती झाली. त्यात विद्यमान कृष्णगोपालजी, अरुणकुमारजी, मुकुंदजी, रामदत्तजी यांचा समावेश असून दोन नवीन सहसरकार्यवाह नियुक्त केलेले असून, त्यात पश्चिम क्षेत्राचे प्रचारक असलेले अतुल कृष्णाजी लिमये व अ. भा. सहप्रचार प्रमुख असलेले आलोककुमारजी यांची नियुक्ती झाली आहे. या दोन्ही नियुक्तीमुळे संघाच्या घडामोडींकडे लक्ष असलेल्या माध्यमे, बुद्धिवंत यांच्यात आश्चर्याचा तसेच स्वयंसेवकांमध्ये सुखद धक्का बसला. कारण, हे दोघेही तरूण वयात या पदावर पोहोचलेले आहेत.
महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करायचा, तर अतुलजी लिमये नाशिकचे स्वयंसेवक आहेत. अतुलजी प्रांत प्रचारक व क्षेत्र प्रचारक असताना आम्हाला त्यांचा सहवास लाभला. संघामध्ये अशा वरच्या जबाबदारीत नियुक्त झाल्यानंतर, असे एखाद्या प्रचारक कार्यकर्त्याबद्दल लिहावे की नाही, हा संकोच असतो. कारण, मुळातच या नियुक्त्या या संघकामाच्या परिपाठीचा भाग असून त्यात वरचे-खालचे पद अशा विषयांची चर्चा नसते. मात्र, समाजात अशी चर्चा जरूर असते. सामान्य स्वयंसेवकापासून सुरू झालेला प्रवास पूर्णवेळ प्रचारकी जीवनात परिवर्तीत होऊन, तो सहसरकार्यवाहपदापर्यंत होणे, ही नाशिककरांच्या दृष्टीने खूपच आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.
कै. कृष्णाजी व सुलभाताई लिमये या उभयता वकील दाम्पत्याचे अतुल हे सुपुत्र. त्यांचे वडील जबाबदारी घेऊन, संघकाम करणारे होते. त्यांनाही भेटण्याचा मला योग आला. अतुलजी प्रारंभी जुन्या नाशिकच्या तानाजी शाखेचे काम बघत. नंतर सिडको परिसरात ते वास्तव्यास आले. वकिलीच्या व्यवसायात असताना, त्यांचे वडील नाशिक व निफाड येथील न्यायालयात प्रॅक्टिस करायचे. एका दुर्दैवी अपघातात निफाड प्रवासात अतुलजी यांचे पितृछत्र हरपले. अतुल व भूषण या दोन सुपुत्रांची जबाबदारी सुलभाताईंवर आली. अतुलजी हे अभियांत्रिकीचे शिक्षण कराड येथे घेत होते. ते सिडको नगरातील अर्जुन सायम शाखेचे स्वयंसेवक होते. वडिलांच्या मृत्यूनंतर तिसर्याच दिवशी ते अर्जुन शाखेत आल्याची आठवण ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव गारे सांगतात.
अतुलजी यांनी बीई व भूषण यांनी आई-वडिलांसारखेच वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर अतुलजींनी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात काही काळ नोकरी केली. ते संघाच्या नगर व शहर जबाबदारीत होते. शहराचे महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुखही होते.संघकामातील गृहस्थी कार्यकर्ते व प्रचारक कार्यकर्ते या दोन समांतर चालणार्या; परंतु परस्पर पूरक असलेल्या, श्रेणीमध्ये प्रचारक कार्यकर्ता होण्याचे स्वप्न तरूण ध्येयवादी स्वयंसेवकांमध्ये निश्चित असते. अर्थात, प्रचारक निघण्याचा निर्णय करणे, हे त्या स्वयंसेवकाच्या खंबीर मनस्थितीवर अवलंबून असते. तसेच ते कुटुंबातील घटकांकडून अनुकूलता मिळण्यावर देखील असते. उच्च शिक्षण झाल्यावर, कौटुंबिक जबाबदारी स्वीकारणे, ही अपेक्षादेखील स्वाभाविक असते. अशा वेळेस घरच्यांच्या अपेक्षांना मुरड घालून, त्यांना आपल्या भावी ध्येयवादी जीवनप्रवासाचा निर्णय सांगणे, हे सोपे नसते. त्यामुळे त्या सर्व परिस्थितीवर मात करून, स्वयंसेवक प्रचारक होत असतो. अतुलजींचा प्रवासदेखील तसाच सुरू झाला. वडिलांचा संघकामाचा वारसा व आईदेखील राष्ट्र सेविका समितीच्या सेविका, तसेच त्यांचे मामा (कल्याण येथील मामा जोशी) हे नांदेड जिल्ह्यात संघ प्रचारक होते. यामुळे काहीशी अनुकूलता झाली असणार.
प्रारंभी खेड, आंबेगाव तालुका प्रचारक, संभाजीनगर जिल्हा प्रचारक, रत्नागिरी, ठाणे विभाग प्रचारक, देवगिरी प्रांत (मराठवाडा, खानदेश) सहप्रांतप्रचारक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारक पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पश्चिम क्षेत्र प्रचारक (महाराष्ट्र, गुजरात, गोवा) (२०१८) आणि आता (२०२४) अ. भा. सहसरकार्यवाह असा त्यांचा प्रचारक जीवनाचा प्रवास आहे.
ते अन्य प्रांतांत विभाग प्रचारक असल्यामुळे, त्यांची भेट अ. भा. प्रतिनिधी सभेत होत असे. क्षेत्रशः निवास असल्यामुळे, थोड्याशा गप्पा, विचारपूस होत असे. तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी ‘अरे अतुल’ असेच म्हणायचो. कारण, वयातील अंतर हा एक भाग होता आणि शहर स्तरापर्यंतच्या कामात त्यांना बघितलेले असल्यामुळे, अनौपचारिकता देखील होती. परंतु, ते प्रांत प्रचारक म्हणून नियुक्ती झाल्यावर, आम्ही त्यांना म्हटले की, “आम्हाला आता तुम्हाला अरे-तुरे करता येणार नाही.” त्यावर ते हसून म्हणाले की, “हो, आता तुम्हाला खरंच जड जाणार आहे.” अर्थात, संघरचनेमध्ये कार्यक्षेत्र वाढल्यानंतर स्वाभाविकच एक आदर हा निर्माण होत असतो, तो त्या कार्यक्षेत्राच्या अनुभवाचा आदर असतो. हे सहजगत्या घडत असते.
संघकामातील कुशलता
प्रांत प्रचारक व क्षेत्र प्रचारक असताना अतुलजींचा सहवास लाभला. प्रांताच्या अनेक बैठकांमध्ये त्यांची विषय मांडणी ऐकायला मिळाली. त्यांची विषय मांडणी ही मुद्देसूद आणि आटोपशीर असते, त्यात फार पाल्हाळ नसते. बैठकदेखील मुद्द्यांवर चर्चा करणारी असावी, ती भरकटू नये, यासाठी ते मार्मिक शैलीतील एखादे वाक्य बोलून, पुन्हा सगळ्यांना ट्रॅकवर म्हणजे मूळ मुद्द्यावर आणतात. प्रांत प्रचारक म्हणून सर्व जिल्ह्यांचा विस्तृत प्रवास, बैठका, प्रशिक्षण वर्ग, संघ शिक्षा वर्ग यांचे आयोजन-नियोजन यात त्यांचे कौशल्य दिसून यायचे. रात्रीच्या प्रवासातून आल्यावर पहाटे पुरेशी झोप झालेली नसतानादेखील उत्साहाने सकाळची प्रभात शाखा अथवा भेटी, यासाठी ते हसतमुख तयार असतात. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपलब्ध वेळेत त्यांचा आवश्यक व नेमका व्यायाम करताना ते आपल्याला दिसतात.
तरूण पिढीत आता कोणते विषय चर्चेत असतात, त्याची त्यांना उत्तम जाण असते. त्यामुळे ते तरुणांशी सहज संवाद करतात. मला आठवतं, ’सैराट’ चित्रपट खूप चर्चेत आला होता, त्यावरून त्यांनी त्याची गाणी किती प्रभावी आहेत, हे सहज बोलताना सांगितले होते. यावरून समाजात जे विषय मध्यवर्ती येतात, त्याची संघ कार्यकर्ता म्हणून लक्ष ठेवण्याची त्यांची हातोटी आहे.
समस्या निवारण व आव्हानांशी सामना
त्याचबरोबर आपल्यासमोर आव्हाने कोणती आहेत, त्याचेही त्यांना चांगले आकलन असते. समाजातील समस्येशी थेट भिडण्यासाठी ते स्वयंसेवकांना प्रवृत्त करतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात काही वैविध्यपूर्ण उपक्रम सुरू झाले. पंढरपूरच्या वारीत ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या रवाना होतात. मुक्कामाच्या ठिकाणी वारी पुढे गेल्यानंतर, मलमूत्रामुळे होणार्या प्रचंड अस्वच्छतेचा अनुभव मार्गावरील गावे घेत असत. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी, विविध संस्थांना एकत्र करून, समाजाचा सहभाग त्यात मिळेल, असा प्रयत्न व शासनाच्या आवश्यक सहकार्याने ’निर्मल वारी’ असा उपक्रम अत्यंत यशस्वी झालेला आपल्याला दिसतो. तसेच आता त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी येणार्या वारी मार्गावर ‘निर्मल वारी’ प्रयोग यशस्वी झालेला आहे.
‘शिवशक्ती संगम (२०१६)’ या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा एक दिवसाच्या एकत्रीकरणासाठी हजारो स्वयंसेवकांना एकत्र आणण्याचा अलीकडचा सगळ्यात महत्त्वाकांक्षी कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने ग्रामीण भागात संघ कार्यकर्त्यांचा झालेला प्रवेश, त्याचबरोबर भरपूर नवीन तरुणांचा संघात झालेला प्रवेश, ही या कार्यक्रमाची फार मोठी उपलब्धी. ग्रामीण भागातील प्रवासात जबाबदारी घेऊन काम करणारे अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमातून संघाकडे आकृष्ट झाल्याचे दिसते. पश्चिम महाराष्ट्रातील संघकामाची कोंडी फोडून, व्याप्ती वाढविण्यासाठी या कार्यक्रमाचा खूप उपयोग झाला.
समाजातली आव्हाने कोणती आहे, ती समजून घेऊन, त्याचे स्वरूप समजून घेऊन, त्यावर मात करण्यासाठी राष्ट्रीय विचारांच्या शक्तीने योग्य पद्धतीने काम केले पाहिजे, यावर त्यांचे लक्ष आहे. त्यामुळेच शहरी नक्षलवाद व त्याचे सर्व नेटवर्क या सगळ्याचा नीट अभ्यास करून, त्यासाठी एक वैचारिक व्यासपीठ उभे केले पाहिजे, यातूनच ‘विवेक विचार मंच’ या मंचाचा प्रारंभ झाला. ‘विवेक विचार मंच’ अशा काही सामाजिक समस्यांना थेट भेटण्यासाठी, वैचारिकदृष्ट्या काम करत आहे.
शाखा कार्य, व्यवस्था परिवर्तन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम व्यक्तिनिर्माणाचे असून, विविध क्षेत्रांचे काम हे संबंधित क्षेत्रात राष्ट्रीय विचारांच्या आधारे व्यवस्था परिवर्तनाचे आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांनी आपल्या क्षेत्रातल्या नेमक्या समस्या व त्यावरचे ठोस उपाय यावर काम करण्यासाठी कार्यकर्त्यांचे गट उभारावे, अशी त्यांची मांडणी असते. असा अभ्यास करून शासनाला आपण सहकार्य करावे, सूचना पोहोचवाव्यात असे प्रयत्न त्यांनी केले. लोकशाहीतील सामाजिक संस्थांचे नेमके काम ते लक्षात आणून देतात. यासाठी काही स्वतंत्र संस्थांची निर्मिती त्यासाठी करण्यात आली आहे.
दैनंदिन शाखा हा आपल्या कामाचा आत्मा आहे. त्यांची जडणघडण अशा शाखांवर झालेली असल्याने, बालांच्या शाखेवर देखील ते आज रमू शकतात, त्याचबरोबर समाजातील मान्यवर व्यक्तींशी देखील ते संवाद साधू शकतात. त्यांच्याकडे निर्णय मिळताना दिरंगाई नसते. झटपट निर्णय करण्याची त्यांची हातोटी आहे. अर्थात, त्यासाठी लागणारी ‘थॉट प्रोसेस’ त्यांच्या कुशाग्र बुद्धीने केलेली असते, हे आपल्या लक्षात येते.
विमर्श
अलीकडच्या काळात संघशताब्दीच्या निमित्ताने वैचारिक आव्हानांचा नेमका प्रतिवाद करण्यासाठी ‘विमर्श’ असा विषय सुरू झालेला आहे. खरे तर संघाची स्थापना व विविध क्षेत्रांचा प्रारंभ हा राष्ट्रीय विचारांचा विमर्श स्थापित करण्यासाठीच झालेला असला, तरी आज राष्ट्रविरोधी शक्तींनी जी वैचारिक आव्हाने देशासमोर उभी केलेली आहेत, त्यांना तितक्याच ताकदीने उत्तर द्यावे लागेल. आव्हानांचे दृश्य व छुपे स्वरूप, त्यांचे शस्त्र-अस्त्र ओळखून त्यांचा मुकाबला राष्ट्रीय विचारांना करावा लागणार आहे. यासाठीची मांडणी आता केली जात आहे. त्या विषयाची देखील त्यांची माहिती व ज्ञान अत्यंत अपडेट असल्याचे आपल्याला जाणवते. अतुलजी विभाग प्रचारक असताना, प्रतिनिधी सभेत भेटायचे, तेव्हा फावल्या वेळात एखादे पुस्तक वाचताना दिसायचे. आजही त्यांच्या बोलण्यात काही नवीन पुस्तकांचा सहज संदर्भ आपल्याला मिळतो. खरेतर भरपूर प्रवास, पाठोपाठच्या बैठका अथवा भेटी, कार्यक्रमांची शृंखला अशा प्रचारकी जीवनाच्या धावपळीत शांतपणे वाचन करणे, हे खूप अवघड असते. परंतु, कमी वेळात शीघ्र गतीने वाचन करून, नेमकेपणे त्याचे आकलन हे त्यांचे वेगळेपण लक्षात येते.
प्रचार विभाग
मीडिया व त्याचा प्रभाव याकडेही त्यांचे बारकाईने लक्ष असते. मी प्रांत प्रचार प्रमुख असताना, यासंबंधीचे अनेक बारकावे त्यांनी प्रचार विभागाच्या बैठकीत लक्षात आणून दिलेले आहेत. त्यासंबंधी उपयुक्त सूचना व मार्गदर्शन ते करतात. महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांच्या प्रकाशनांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यात विक्री व वितरणाचे काही नवीन प्रयोग सुरू आहेत.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन व्याख्यानमालांनी समृद्ध केलेले आहे. त्यामुळे शेकडो वक्ते उभे राहिले. तसेच हजारो श्रोतेदेखील तयार झाले. त्यातून मिळणारे ज्ञान-रंजन-माहिती समाजाला आवडते. पूर्वी सोशल मीडिया नसल्याने, अशा व्याख्यानांचा खूप मोठा प्रभाव शहरी ते ग्रामीण भागावर असायचा. वर्षानुवर्ष व्याख्यानमालांची परंपरा जोपासणारी अनेक ध्येयवादी मंडळी आहेत. या व्याख्यानमाला संयोजकांशी संपर्क व्हावा, असा विषय आम्हाला त्यांनी प्रचार विभागात सूचवला. त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो आणि अशा पदाधिकार्यांना भेटणे, एकत्र आणणे, त्यांच्या समस्या समजावून घेणे, त्यांनी आपापल्या क्षेत्रात आपापले काम करीत राहावे; परंतु परस्पर समन्वय असावा. राष्ट्रीय विचार, सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी कोणते विषय करता येतील, असे अनेक विषय त्यांच्या एकत्रीकरणातून साधले.
विविध क्षेत्र मार्गदर्शन
महाराष्ट्रातील जनजातीय क्षेत्र मोठे आहे. तेथील सामाजिक जीवन वैशिष्ट्यपूर्ण आहे. या क्षेत्रात राष्ट्रीय विचारांचे काम चांगले रुजलेले आहे. परंतु, या क्षेत्रात देखील मोठी सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आव्हाने उभी राहत आहे. या आव्हानांचा आपल्याला प्रतिवाद करता आला पाहिजे, यासाठी जनजाती क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते कुशलतेने मार्गदर्शन करतात. या विषयासाठी नाशिक येथे मीडिया सेंटर सुरू केले आहे.
विविध क्षेत्र व विविध शैक्षणिक, आर्थिक, सेवाविषयक अशा सर्व संस्थांचे कार्यकर्ते आवश्यकतेनुसार विचारविनिमय करण्यासाठी, संघ अधिकार्यांना भेटण्याची व्यवस्था असते. प्रांत व क्षेत्र स्तरावर हे काम खूपच व्यापक होत जाते. अशा अनेक संस्थांनी अतुलजी यांच्या मार्गदर्शनाचा अनुभव घेतलेला आहे.
कार्यक्षेत्रातील प्रतिभा
संघामधील जबाबदारी ही खरं म्हणजे कोणत्याही सत्ता पदासारखी नाही. परंतु, अलीकडच्या काळात संघाला एक विशिष्ट वलय प्राप्त झालेले असल्यामुळे, तेथील नियुक्त्या अथवा जबाबदार्यांची चर्चा समाजात व माध्यमांमध्ये होत असते. त्याचे काही फायदेदेखील असतात. त्यामुळेच नाशिकमधील एक उच्च विद्याविभूषित सामान्य स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ प्रचारक होतो आणि विविध कार्यक्षेत्रांचा अनुभव घेत, संघाच्या अखिल भारतीय टीममध्ये सहजगत्या सामावला जातो. हे संघाच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे घडते, हे समाजाला लक्षात येते. आपल्या प्रतिभेने आपल्या कार्यक्षेत्रात संघटन बांधणी व संघविचारांचे योग्य पद्धतीने प्रकटीकरण व्हावे, हे अखिल भारतीय नेतृत्वाला अपेक्षित असते. सर्वच प्रांतात असे कार्यकर्ते असतात, तरीसुद्धा त्या-त्या प्रांताची अथवा राज्याची एक सामाजिक चौकट असते, विचारांचा एक अखंड प्रवाह असतो. या सगळ्यांना समजावून घेऊन, संघविचारांचा प्रभाव निर्माण करण्याचे काम त्या-त्या नेतृत्वाला करावे लागते. संघाच्या कार्यपद्धतीत देशभर सारखेपणा असला, तरीसुद्धा स्थल-काल-व्यक्तिसापेक्ष असे काम उभे करायचे असते. आपल्या प्रतिभेने त्या कार्यपद्धतीला जीवंत माणसांच्या कामात परिवर्तित करायचे असते. हे करताना कार्यकर्त्याची प्रतिभा, मानसिकता, बुद्धिमत्ता यांना हे आव्हान असते. महाराष्ट्र प्रांतात अशा नामवंत प्रचारकांच्या प्रभावळीमध्ये अतुलजींनी अल्पावधीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याची परिणती म्हणून संघशताब्दीच्या वर्षात त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी आलेली असावी. त्यामुळे आम्हा सर्वच नाशिककरांना आनंद व अभिमान वाटतो.
ज्येष्ठ संघप्रचारक कै. शिवराय तेलंग यांनी म्हटल्याप्रमाणे, “प्रचारक ही हिंदू समाजाने संघाला दिलेली देणगी असून, स्वयंसेवक ही संघाने समाजाला दिलेली देणगी आहे.” यात खूप गहन अर्थ भरलेला आहे. याचा अर्थ असा की, प्रचारक ही संकल्पना आपल्याकडे रूढ होती. हिंदू धर्मामध्ये संन्यास घेणे अथवा आपल्या ध्येयाप्रति जीवनव्रती म्हणून पूर्ण आयुष्य समर्पित करण्याची परंपरा या समाजात फार पूर्वीपासून आहे. ती संघाने संघटनेमध्ये वेगळ्या पद्धतीने वापरलेली असून, त्याला एक नवीन आशय प्राप्त करून दिलेला आहे. मात्र, स्वयंसेवक होणे म्हणजे आपले जीवन हिंदू संस्कारांनी युक्त होण्यासाठी व समाज संघटित राहण्यासाठी राष्ट्रविचार हा आपल्या जीवनाच्या अग्रक्रमात येण्यासाठी व्यक्ती घडवणे होय. अशा प्रचारक परंपरेत अतुलजी आहेत.
त्यांच्या नियुक्तीने त्यांच्या शाखेतील स्वयंसेवक, विविध स्तरातील कार्यकर्ते, लिमये कुटुंबाशी परिचित अनेकांना हा आनंद झालेला आहे. त्यांच्या मातोश्री आदरणीय सुलभाताई या राष्ट्र सेविका समितीच्या जिल्हा कार्यवाह राहिलेल्या आहेत. त्यांचे बंधू भूषण हे नाशिकमधील प्रथितयश वकील आहेत. नियुक्तीची वार्ता कळल्यावर, त्यांच्या घरून फोन आला. मातोश्री बोलत होत्या. त्यांचा आनंद त्या शब्दातून जाणवत होता. समितीच्या कार्यकर्त्या असल्याने, त्या आनंदाची एक वेगळी उंची जाणवत होती. त्यांच्याशी फोनवर बोलताना मी व पत्नी दोघांनाही डोळ्यातील आनंदाश्रू रोखता आले नाही. त्यांच्या सहज बोलण्यातून देखील विलक्षण प्रेरणा व ऊर्जा प्राप्त झाली.
शतकाकडे वाटचाल करीत असलेल्या, संघाच्या कार्यात अशा हजारो कार्यकर्त्यांनी समर्पित जीवने अर्पण केलेली आहेत. म्हणूनच त्यांना देवदुर्लभ कार्यकर्ते असे पू. बाळासाहेब देवरस यांनी म्हणून ठेवलेले आहे.
दिलीप क्षीरसागर
(लेखक प्रांत कार्यकारिणी सदस्य, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, रा. स्व. संघ आहेत.)
९४२२२४५५८२