मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Attack on Christians in bangladesh) बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराच्या घटना एकामागोमाग येत असतानाच आता ख्रिस्ती समुदायावरही इस्लामिक कट्टरपंथींनी हल्ला केल्याचे निदर्शनास आले आहे. नाताळच्या दिवशी ख्रिश्चन समाजाची १७ घरे जाळण्यात आली असून संपूर्ण प्रकार बंदरबनच्या लामा उपजिल्हामध्ये घडली आहे. यावेळी गावकरी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले असल्याने सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र गावकऱ्यांच्या मालमत्तांचे मोठे नुकसान या हल्ल्यात झाले आहे.
हे वाचलंत का? : "तीन मजलेच नाहीतर संपूर्ण संजौली मशीद अवैध", देवभूमी संघर्ष समितीचा दावा
मिळालेल्या वृत्तानुसार, दि. २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी हा हल्ला झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यावेळी गावातील लोक दुसऱ्या गावात असलेल्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले होते. या हल्ल्यात साधारण १७ ते १९ घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. सर्व घरे जळून खाक झाली होती. गावातील सर्व घरे बांबू आणि गवताची असल्याने आगीने लवकर पेट घेतला. या घटनेत त्यांचे 15 लाखाहून अधिक रुपयांचे (बांगलादेशी चलन) नुकसान झाल्याचे ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी सांगितले.
गावकऱ्यांनी सांगितले की, त्यांना काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. २५ डिसेंबरच्या रात्री गावकरी गावातून निघून गेल्यावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. स्थानिक प्रशासनाकडून बाधित कुटुंबांना मदत सामग्री पुरवण्यात आली असली तरी आपल्या राहण्याचा मोठा प्रश्न सध्या पीडितांना सतावत आहे.