स्व. वसंतराव डावखरेंच्या स्मृतिप्रित्यर्थ शिक्षकांना वसंतस्मृती पुरस्कार

रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

    29-Nov-2024
Total Views |
Vasantrao Davkhare

ठाणे : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे ( Vasantrao Davkhare ) यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील १२५ आदर्श शिक्षक व १० आदर्श संस्थाचालकांचा वसंतस्मृती पुरस्कारासह सन्मान करण्यात येणार आहे. ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये रविवारी (ता. १ डिसे.) होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असेल.

कोकणातील सागरी,नागरी आणि डोंगरी भागात नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थी हितासाठी दक्ष असलेले आदर्श शिक्षक व आदर्श संस्थाचालकांचा गौरव व्हावा, यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी २०१८ पासून वसंतस्मृती शिक्षक पुरस्कार सोहळा सुरू केला आहे. यंदाही कोकणातील शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र चव्हाण असतील. तर स्वागताध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आहेत. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे खासदार हेमंत सावरा, आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपा ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजनक विकास पाटील, एन. एम. भामरे, सचिन बी. मोरे, ज्ञानेश्वर घुगे उपस्थित असतील. या कार्यक्रमाची किशोर पाटील, विनोद शेलकर, संभाजी शेळके, सुभाष सरोदे, रमेश शर्मा, मुकेश पष्टे यांच्याकडून तयारी करण्यात येत आहे.

प्रतिष्ठेचा वसंत स्मृती पुरस्कार

कोकणाच्या कानाकोपऱ्यातील गुणवंत शिक्षकांची दखल घेणारा पुरस्कार म्हणून वसंत स्मृती आदर्श पुरस्काराने ओळख निर्माण केली आहे. सामान्य शिक्षकातील कलागुण व नाविन्यपूर्णता लक्षात घेऊन शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यामुळे कोकणातील शैक्षणिक वर्तुळात हा पुरस्कार प्रतिष्ठेचा आहे.