आयात शुल्काचा दांडपट्टा

    26-Nov-2024
Total Views |
import duty stamp


अमेरिकेमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादित करत, डोनाल्ड ट्रम्प यांनी राजसत्तेचे सोपान चढले. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ नार्‍याची मोहिनी अशी काही अमेरिकेच्या नागरिकांवर होती की, त्यांनी ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग लिलया सुकर केला. 20 जानेवारीच्या आसपास अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेऊन ट्रम्प राजवस्त्रे स्वीकारतील. असे असले तरी तेथील नियमाप्रमाणे ट्रम्प यांनी जबाबदारी स्वीकारण्याआधीच पुढील नियोजनाची तयारी सुरु केली आहे.

ट्रम्प यांनी नुकतीच त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांची घोषणा केली होती. आता त्यांनी सत्तेवर आल्यानंतर आयात शुल्काविषयीचे दर निश्चित केले आहेत. त्यात कॅनडा, चीन आणि मेक्सिको या देशांचा प्राथमिक यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ट्रम्प निवडून येताच आयात शुल्काविषयीच्या अमेरिकेच्या नियमांमध्ये बदल होणार, हे निश्चित होते. तसे ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये बोलूनदेखील दाखवले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी भारतावर देखील जोरदार टीका केली होती. मात्र, आयात शुल्काच्या पहिल्या यादीमध्ये प्रत्यक्षात भारताला ट्रम्प यांनी वगळले आहे.

ट्रम्प यांनी नुकतेच समाजमाध्यमांवरील संदेशातून कॅनडा आणि मेक्सिको यांच्यावर 25 टक्के शुल्क लादणार असून, जोवर चीन सरकार सिंथेटीक ओपिओईडची तस्करी थांबवत नाही, तोपर्यंत चीनवर दहा टक्के अधिकचे शुल्क लादणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. द्विपक्षीय व्यापारातील समतोल साधण्यासाठी ट्रम्प यांच्या आदेशावरून, ‘इकोनॉमिस्ट इंटेलिजंट युनिट’ने दहा देशांची यादी तयार केली असून, त्यात मेक्सिको, चीन आणि कॅनडा पहिल्या तीन स्थानांवर आहेत, तर या दहा देशांच्या यादीमध्ये भारताला आठवे स्थान देण्यात आले आहे.

चीनवरील अतिरिक्त दहा टक्के आयात शुल्क लादण्याच्या भूमिकेचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की, “फेटांनाईलच्या बाबतीत सांगायचे, तर मी वेळोवेळी चीनच्या अधिकार्‍यांशी या औषधनिर्मितीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या घटकाच्या तस्करीबाबत चर्चा केली आहे. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. चीनचे अधिकारी कायमच अशी तस्करी करणारी माणसे आढळल्यास मृत्युदंडाची शिक्षा देण्याचे वचन देत असतात. मात्र, कृतीमध्ये काहीही करताना दिसत नाहीत,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान भारतावर टीका करताना अमेरिकेच्या सवलतींचा सर्वात मोठा गैरफायदा भारत घेत असल्याचा आरोप केला होता. तसेच सत्तेत येताच भारताच्या 75 दशलक्ष किमतीच्या व्यवहारावर आयात शुल्क लादण्याचा मानसदेखील व्यक्त केला होता. मात्र, आता जाहीर केलेल्या देशात भारताचे नाव ट्रम्प यांनी घेतलेले नाही. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आयात शुल्क नीतीचे परिणाम आत अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. ट्रम्प यांच्या नवीन धोरणाचा विपरीत परिणाम दक्षिण आफ्रिकेच्या चलन दरावर झाला आहे. चीनबरोबर आफ्रिकेचा मोठा व्यापार असून, ट्रम्प यांच्या नव्या धोरणामु़ळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम निश्चित मानला जात आहे. त्यामुळे चीनशी थेट व्यापार असलेल्या देशांना या निर्णयाचा ‘बटरफ्लाय इफेक्ट’ सहन करावा लागत आहे. याच ‘बटरफ्लाय इफेक्ट’मुळे दक्षिण आफ्रिकेच्या रैंडमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली आहे.

ट्रम्प यांनी चीनवर अधिक आयात शुल्क आकारायचा मनसुबा जाहीर केल्यानंतर, चीनने ट्रम्प यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. चीनच्या अमेरिकेतील वॉशिंग्टन दुतावासातील प्रवक्त्यांनी चीनची बाजू मांडताना “अशा निर्णयांनी हे व्यापार अथवा आयात शुल्क युद्ध कोणीच जिंकू शकत नाही, यापेक्षा परस्परपूरक नितीच्या साहाय्याने एकमेकांच्या गरजांची पूर्तता करणे सगळ्यांच्याच भल्याचे असल्याचे” चीनने म्हटले आहे. चीन काहीही म्हणत असला, तरी सध्याची त्याची अर्थव्यवस्था त्याला प्रत्येक व्यापाराची गरज आहेच, आणि गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीस अनुकूल वागण्यात चीन माहीर आहे. त्यामुळे ट्रम्प या निर्णयावर ठाम राहतील, हे निश्चित. ट्रम्प यांचा आयात शुल्क नामक दांडपट्टा कॅनडा आणि मेक्सिकोवर देखील फिरणार हे निश्चित झाले आहे. भारताने सजग राहणे फायद्याचे आहे.

कौस्तुभ वीरकर