मुंबई : सध्या ओटीटी वाहिन्यांवरील वेब सीरीज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मिर्झापूर या सीरीजनंतर पंचायत या वेब सीरीजलाही प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. पंचायतचे तीन सीझन यशस्वी झाल्यानंतर आता चौथा सीझन लवकरच भेटीला येणार असून पंचायत ४ चे चित्रिकरण सुरु झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा फुलेरामध्ये पंचायत होणार असल्यामुळे प्रेक्षक उत्सुक आहेत.
पंचायत या वेब सीरीजने भारतासह २४० देशांमध्ये लोकांची मनं जिंकली. दरम्यान, ‘पंचायत’च्या चौथ्या सीझनच्या चित्रीकरणाचे फोटो ‘प्राइम व्हिडीओ’ने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता जितेंद्र कुमार, चंदन रॉय आणि फेजल मलिक दिसत आहेत. द व्हायरल फीवर ‘पंचायत ४’ सीरिजची निर्मिती करत असून दीपक कुमार मिश्रा आणि अक्षय विजयवर्गीय यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
‘पंचायत ४’मध्ये जितेंद्र कुमार, चंदन रॉय, फेजल मलिक यांच्या व्यतिरिक्त रघुबीर यादव, नीना गुप्ता, सांविका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसेच, या सीझनमध्ये कीह नवीन कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.
पंचायत ३ चे कथानक ‘पंचायत ४’मध्ये पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. लाडके सचिव जी परीक्षा देण्यासाठी शहरात जातात आणि नेमकी त्याचवेळी प्रधानचेपती रघुवीर यादववर कोणीतरी गोळी झाडतं. हे संपूर्ण प्रकरण राजकारणासंबंधित संबंधित आहे. त्यामुळे नेमकी गोळी कोणी झाडली आणि त्याचं कारण काय हे चौथ्या भागात नक्की समजेल. ‘पंचायत’चा चौथा संपूर्ण सीझन निवडणुकांवर आधारित असणार असेही सांगितले जात आहे.
तसंच या सीझनमध्ये तीन कथा असू शकतात. निवडणुकीवरून झालेली गदारोळ, सचिव आणि रिंकीची प्रेमकहाणी आणि कॅटचा निकाल आणि प्रल्हाद निवडणुकीत सहभाग घेणार की नाही या तीन कथा दिसू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार ‘पंचायत ४ ’ २०२६ साली प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.