आता डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवा; निवृत्तीवेतनधारकांसाठी केंद्राची मोहीम!

    23-Oct-2024
Total Views |
center-will-run-a-month-long-campaign


मुंबई :     
 निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल माध्यमातून जीवन प्रमाणपत्र मिळविण्याच्या उद्देश्याने केंद्र सरकारकडून नवी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकार येत्या १ नोव्हेंबरपासून एक महिन्याकरिता निवृत्तीवेतनधारकांसाठी देशव्यापी डिजिटल हयात प्रमाणपत्र मोहीम सुरू करणार आहे. देशभरातील ८०० जिल्हे आणि शहरांमध्ये नोव्हेंबरपासून मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.



निवृत्तीवेतनधारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र अनिवार्यपणे सादर करावे लागते. याच पार्श्वभूमीवर पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग तिसरी देशव्यापी डिजिटल हयात प्रमाणपत्र मोहीम राबवित आहे. यंदा फेस मॅचिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यावर भर दिला जाईल, असे कार्मिक व निवृत्ती वेतन मंत्रालयाकडून स्पष्ट केले आहे.

निवृत्तीधारकांचे डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी केंद्र महिनाभर मोहीम राबवणार आहे. दूरदर्शन(डीडी),आकाशवाणी(एआयआर),आणि पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) या मोहिमेला श्राव्य, दृक्श्राव्य आणि छापील प्रसिद्धी देऊन पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. मोहीम जागरूकता प्रसारासाठी एसएमएस, ट्विट (#DLCCampaign3), प्रचारकाव्य आणि लघुपट सादर करत अधिक पूरक प्रयत्न केले जाणार आहेत.