मुंबई : दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट केजीएफचा अभिनेता यश रामायण चित्रपटात झळकणार आहे. गेले अनेक दिवस रामायण या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका करणार यावरुन जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, चित्रपटाची टीम किंवा कोणत्याही कलाकाराकडून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. आता स्वत: यश याने रामायण चित्रपटात तो रावणाची भूमिता साकारणार असल्याचे जाहिर केले आहे.
दरम्यान, यशने एका मुलाखतीत लवकरच 'केजीएफ ३' देखील येणार असल्याचे सांगितले. 'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत यश म्हणाला, "मी चाहत्यांना वचन देतो की केजीएफ ३ नक्कीच येणार आहे. पण सध्या दोन प्रोजेक्ट्सवर (रामायण आणि टॉक्सिक) काम सुरु आहे. केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबतही चर्चा सुरु आहे, मात्र वेळ योग्य असली पाहिजे. आम्ही याबद्दल सतत बोलत असतो. आमच्याकडे एक चांगली आणि तगडी कल्पना आहे. त्यामुळे यावर पूर्ण लक्ष देणंच योग्य असेल म्हणून आम्ही वेळ मिळेल तेव्हा हे काम हाती घेणार आहोत. यात मला कसलीच घाई करायची नाही. चाहत्यांसाठी केजीएफ ३ आणखी स्पेशल बनेल असा माझा प्रयत्न आहे. चाहत्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं त्यामुळे आता त्यांना गर्व वाटेल असा सिनेमा बनवायचा आहे."
'रामायण' चित्रपटाविषयी बोलताना यश म्हणाला, "मी खूप उत्साहित आहे. भूमिकेकडे भूमिका म्हणूनच पाहावं...जर असं नाही झालं तर चित्रपट होणारट नाही. तसंच इतक्या बजेटसोबत चित्रपट बनवायचा त्यासाठी तसे कलाकारही एकत्र आणणं गरजेचं आहे. रावणाची भूमिका अतिशय खोल आणि गुंतागुंतीची आहे. म्हणूनच मी याकडे प्रभावित झालो आणि भूमिका स्वीकारली. ही माझ्या करिअरमधील सर्वात बेस्ट भूमिका असेल."
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभु श्रीराम यांच्या भूमिकेत तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असे सांगितले जात असून तीन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.