मुंबई, दि.२ : (Samruddhi Mahamarg Expressway) मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील अपघाताने आरटीओने या महामार्गावरील गस्त वाढवून वाहनांना शिस्त लावण्यासाठी गेली दोन वर्षे उपाययोजना केल्या त्याला आता हळूहळू यश येत असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या आठ महिन्यात समृद्धी महामार्गावर ६३ प्राणांकित अपघातात १२० जणांचा बळी गेला होता. यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट २०२४ मध्ये ५७ प्राणांकित अपघातात ८० जणांचा बळी गेला आहे. म्हणजे अपघातात १० टक्के कमतरता झाली आहे. तर एकूण अपघाताच्या संख्येत १९ टक्के घट झाली आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर साल २०२३ मध्ये ८१ प्राणांकित अपघातात १५१ जणांचे प्राण गेले. तर गंभीर जखमी करणारे १७ अपघात घडले असून त्यात ४२ जण गंभीर जखमी झाले. तर किरकोळ जखमी असणारे २२ अपघात घडले असून ५२ जण किरकोळ जखमी झाले. तर १४ अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
साल २०२३मध्ये १३४ अपघात घडले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. तर यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या आठ महिन्याच्या काळात अपघाताची संख्या घटली असून या काळात ५७अपघात घडले असून त्यात ८० जण जखमी झाले आहेत. म्हणजे प्राणांकित अपघाताची संख्या १० टक्के घटली आहे. तर किरकोळ जखमी होणारे ८ अपघात घडले असून त्यात १७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी अपघातांच्या संख्येत ६० टक्के घट झाली असून किरकोळ जखमीच्या संख्येत ५८ टक्के घट झाली आहे.
अशी झाली कारवाई
नाशिक ते नागपूर या मार्गावर २४×७ आठ इंटरसेप्टर व्हेईकल तैनात करण्यात आले आहे. ओव्हर स्पीडिंग वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी लेझर गनचा वापर करण्यात आला. सर्व बस चालकांची ड्रंक अॅण्ड ड्रायव्हिंग मोहीमेत ब्रेथ अनालायझर टेस्ट करण्यात आली. ट्रेड गेज मशिनद्वारे टायरची तपासणी करण्यात आली. अनफिट व्हेइकलची तपासणी करण्यात आली तर लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर देखील कारवाई केली गेली. ओव्हर स्पीडींग ड्रायव्हरना टोल प्लाझा येथे काऊन्सिलिंग करण्यात आले. समृद्धी महामार्गावर १,०३,२६१ टायर तपासणी, १,५६४ रेफलेक्टींग टेप, १८,७७६ बस आणि २४,००८ मालवाहतूक चालकाची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट करण्यात आली. त्यात १०९ बसचालक आणि ५३ अवजड चालक दोषी सापडले. ३,८७९ ड्रायव्हरचे काऊन्सिलिंग केले गेले. अशा या कारवाईत एकूण ३३,५६,२०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.