डोंबिवली, दि. २ : (Rasrang 2024) डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली आयोजित ''रासरंग - २०२४'' हा नवरात्रोत्सव गुरूवारपासून रंगणार आहे. यंदाही अधिक भव्यतेने आणि कलात्मक पद्धतीने या महोत्सवाचे ३ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत डोंबिवली येथील डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. यंदाही नैतिक नागदा यांचे जल्लोषमय संगीत हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
नेत्र दिपवणारा भव्य मंच, नागरिकांना गरब्याचा आनंद घेण्यासाठी प्रशस्त जागा तसेच दांडिया किंग म्हणून सर्वत्र प्रचलित असलेले नैतिक नागदा यांचे थिरकायला लावणारे संगीत आणि याबरोबरीनेच मनसोक्त नृत्याचा आनंद घेणारे अबालवृद्ध, सिने अभिनेते, कलावंत, मान्यवर यांची मांदियाळी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, नवदुर्गांचा सन्मान अशा प्रमुख आकर्षण आणि सोहळ्यांसह यंदाचा रासरंग - २०२४ पार पडणार आहे. २०१८ पासून सुरु असलेल्या या महोत्सवाला आजवर अनेक कलावंतांनी उपस्थिती लावली असून डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमधूनही या ठिकाणी नागरिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. यंदाही याच पद्धतीने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात रासरंग उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे. नैतिक यांच्या तालबद्ध सुरांवर आणि वाद्यांच्या सुंदर आणि तितक्याच अनोख्या अशा सादरीकरणावर तरुणांसह, वयोवृद्ध नागरिकही मनमुरादपणे गरबा नृत्याचा आनंद घेतात. तर दरवर्षी प्रमाणे यंदाही रासरंग - २०२४ महोत्सवात सिने अभिनेते, कलावंत यांची विशेष उपस्थिती असेल.
नवदुर्गांचा सन्मान आणि पुरस्कार
नवरात्रोत्सव म्हणजे नारी शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा उत्सव. याच पार्श्वभूमीवर महोत्सवादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल. तसेच यावेळी या महोत्सवादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले आहे.