मुंबईची महालक्ष्मी

    07-Oct-2024
Total Views | 50

mahalakshmi
 
आज ललिता पंचमी, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला मुंबईच्या महालक्ष्मीची कथा जाणून घेऊया. या मंदिराचे विशेष म्हणजे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या त्रिगुणात्मिका देवतांचे दर्शन एकाच ठिकाणी भक्तांना होते. या जगदंबेच्या कृपेनेच मुंबई ही देशाची लक्ष्मी झाली, असा या महालक्ष्मीचा महिमा. या मुंबईत येणार्‍या आणि मेहनत करणार्‍या प्रत्येकाला, श्री महासरस्वती यश देतेच, तर मुंबईवर येणार्‍या सर्व संकटांतून मुंबईकरांच्या रक्षणासाठी स्वत: महाकालीच रणी उतरते, अशी मुंबईकरांची श्रद्धा आहे.
 
तर घटना अशी घडली, पूर्वी माहीम, वरळी, परळ, माझगांव, बॉम्बे, कुलाबा आणि म्हातारीचे बेट अशा सात बेटांमध्ये विखुरलेली ही मुंबापुरी. या सात बेटांच्या मध्ये समुद्राचे पाणी. त्यामुळे त्याकाळी बॉम्बे बेटावरून वरळी इथे जाण्यासाठी होडीशिवाय पर्याय नसे. बॉम्बेचा तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर असलेल्या जॉन हॉर्नबी याने हा वरळी आणि बॉम्बे बेटामधील पाण्यात भराव घालून, गाडी जाईल असा रस्ता निर्माण करण्याचा विचार केला. तसा त्याचा प्रस्ताव त्याने इंग्लड इथे, परवानगीसाठी पाठवला. मात्र, ब्रिटीशांनी जॉन हॉर्नबीचा प्रस्ताव फेटाळला. मात्र, प्रत्यक्षात संपूर्ण बॉम्बेचा कारभार त्यालाच बघायचा असल्याने, जॉन हॉर्नबीला या वाहतुकीच्या त्रासाची कल्पना होती. म्हणून त्याने वरळीचा बांध बांधण्याचे काम दाखवून, हा भराव घालण्याचे काम विनापरवाना सुरु करण्याचे ठरवले. हा वरळीतील बांध घालण्याची कंत्राट त्याने रामजी शिवजी नामक तरुण अभियंत्याकडे सोपवले. रामजी शिवजी यांनी देखील जोमाने काम सुरु केले. अनेक मोठे दगड भरावाच्या कामासाठी आणण्यात आले. काम तर सुरु झाले. मात्र, एकादिवसाचे काम जेवढे होई, तेवढेच काम रात्री समुद्राच्या पाण्याने वाहून जात असे. बराच काळ यामध्ये वाया गेला, पैशाचा अपव्ययही झाला. मात्र यश काही हाती लागले नाही. मात्र, जॉन हॉर्नबी आणि रामजी शिवजी या दोघांनीही हार मानली नाही.
 
असाच एक दिवस काम संपवून घरी आरामासाठी आलेल्या, रामजी शिवजीच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन सांगितले की, आम्हां तिन्ही देवींची एकसंध मूर्ती या समुद्रात असून, ती तू बाहेर काढून त्यांची स्थापना कर. तुझे हाती घेतलेले कार्य त्या नंतर पूर्णत्वास जाईल. या दृष्टांतावर रामजी शिवजी यांचा विश्वास बसला, त्याने याबाबत परवानगीसाठी जॉन हॉर्नबीकडे विचारणा केली. मात्र, दृष्टांतासारख्या गोष्टींवर जॉन हॉर्नबीचा काडीचाही विश्वास नव्हता. त्याने थेट परवानगी नाकारत, काम सुरु ठेवण्याचा आदेश दिला. मात्र, त्यानंतरही बांधलेले बांधकाम त्याच रात्री वाहून जाण्याचा प्रकार होतच राहिला. आता मात्र, वेळ आणि खर्च हे सगळेच आवाक्याच्या बाहेर गेले होते. जर काम पूर्णत्वास गेले नसते तर, जॉन हॉर्नबीला बडतर्फ होण्याची भिती देखील वाटू लागली होती. म्हणून त्याने नाईलाजाने, पाण्यातील मूर्ती शोधण्याची परवानगी रामजी शिवजी यांना दिली. लहान होड्या आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ही शोध मोहिम राबवली गेली. सुरुवातीला काहीही हाती लागले नाही. मात्र एक दिवस शोधमोहिम सुरु असताना, पाण्यात टाकलेले जाळे जड झाले. ते वर काढले असता, पाषाणामध्ये असलेली तिन्ही देवींची एकसंध मूर्ती बाहेर आली. ती मूर्ती पाण्याच्या बाहेर आणून, या मूर्तीच्या स्थापनेसाठी रामजी शिवजी यांनी जॉन हॉर्नबी यांच्याकडे जागा मागितली. भरावाचे काम पूर्ण करण्याची घाई असलेल्या जॉन हॉर्नबीने अधिक वाद न घालता, सध्याचे मंदिर जिथे आहे, ती जागा देऊ केली. तात्पुरत्या स्वरुपात देवीची स्थापना तिथे करण्यात आली. त्यानंतर वरळी ते बॉम्बे भराव घालण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे, त्यानंतर केलेले बांधकाम एकदाही वाहून गेले नाही. ते भराव घालून रस्ता बांधण्याचे काम अल्पावधीतच पूर्ण देखील झाले. त्यानंतर रामजी कावजी यांनी त्यावेळी ८० हजार रुपये खर्च करून सध्याचे महालक्ष्मी मंदिराची उभारणी केली.
 
मुंबईवर महालक्ष्मीची कृपा झाली ती या दिवसापासूनच. आई महालक्ष्मीच्या स्थापनेनंतरच तत्कालीन बॉम्बेला मोठ्या प्रमाणात जमिनीची निर्मिती होऊन, रस्ते व अन्य सोयी-सुविधांची निर्मिती झाली. यामुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय यांनी कारभारासाठी मुंबईचीच निवड केली. त्यामुळे मुंबईचा एक आर्थिककेंद्र म्हणून उदय झाला. महालक्ष्मीच्या कृपेने आजही महत्वाचे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून मुंबईचे महत्व आबाधित असून, ते दिवसेंदिवस वाढत आहे. आजमितीला मुंबई ही भारताची लक्ष्मी आहे, कारण तिच्या निर्मितीमागे साक्षात महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. अशी प्रत्येकाकडे ज्ञान, वात्सल्य, वैभव देणारी जगदंबा आपल्या सर्वांच्या आयुष्यात अक्षय आनंद देवो याच ललिता पंचमीच्या शुभेच्छा!
 
कौस्तुभ वीरकर
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121