आजपासून देशभरात अश्विन नवरात्रीची सुरुवात होत आहे. जगातील चैतन्यरुपी शक्तीचा स्रोत असणार्या जगदंबेचा हा उत्सव. तिच्या पराक्रमाचे, तिच्या गुणांचे, तिच्या रुपाचे आणि स्वरुपाचे गुणगान करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र उत्सव. अश्विन महिन्यातच शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने, या नवरात्राला शारदीय नवरात्र असेदेखील म्हटले जाते. या नवरात्रीच्या निमित्ताने पराशक्ती या सदरात आपण पुढील नऊ दिवस, महाराष्ट्रातील नऊ देवींची मंदिरे आणि त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत. आजच्या लेखात आपण कोल्हापूरच्या अंबाबाईविषयी जाणून घेणार आहोत. चार वेद, सहा शास्रे जिच्या स्वरुपाचे वर्णन करु शकले नाहीत, अशी ती जगदंबा भक्तांच्या रक्षणासाठी कायमच तत्पर असते.
तर घटना अशी घडली की, कोल्हासूर नावाचा राक्षस जगदंबेचाच उपासक. घोर तपस्या करून भगवतीस त्याने प्रसन्न करून अनेक वर आणि राज्यपद मागून घेतले. मात्र, त्यानंतर मदोन्मत्त झालेल्या कोल्हासुराने असूरवृत्तीस अनुलक्षून आचरण सुरु केले. कोल्हासुराच्या त्रासाने कंटाळलेली त्याची प्रजा, ‘त्राहि माम् त्राहि माम्’ करत देवाचा धावा करत होती. या संकटातून वाचवण्याची याचना भगवतीकडे होती. हळूहळू कोल्हासुराचा त्रास वाढत होता. त्याचबरोबर भक्तांच्या आर्तस्वरांनी आई जगदंबेच्या काळजालाही त्रास होत होता. मातृहृद्यच ते हो!
अखेर भगवतीने कोल्हासुराशी युद्ध करण्याचा निर्धार केला. आधीच त्याला राज्याधिकाराचे वरदान जरी दिले असले, तरी त्याचा उपयोग जनसेवेसाठी न करता, स्वार्थासाठी करणार्या आपल्याच एका भक्ताविरोधात भगवती उभी ठाकली होती. अनेक दिवस घनघोर चाललेल्या या युद्धामध्ये देवीच्या अलौकिक सामर्थ्याने चकित झालेला कोल्हासुर अखेरीस देवीला शरण आला. तेव्हा त्याच्या अंतिम समयी देवीने कोल्हासुरास त्याची अंतिम इच्छा विचारली असता, हे जगदंबे, तुझ्या हातून मृत्यू येत आहे, हेच माझे पुण्य असून आयुष्यभर पाप केलेल्या या राक्षसाचाही तू एक प्रकारे उद्धारच करत आहेस. तेव्हा एवढे मोठे सुख समोर असताना, आता कशाची अभिलाषा मनी बाळगावी, असे उद्गार कोल्हासुराने काढले. मात्र, अखेर देवीच्या वरदानाचा मान ठेवण्यासाठी त्याने, देवीच्या वास्तव्याचे ठिकाण त्याचे नावे ओळखले जावे, अशी आर्त विनवणी जगदंबेस केली. तेव्हापासून जगदंबेच्या निवासस्थान असलेल्या या शहराची कोल्हापूर असे नाव लौकिक पावले. आज कोल्हापूरात असलेले मंदिर हे साधारणपणे १ हजार, ८०० वर्षे जुने असल्याचा शिलालेख मंदिर परिसरात आहे. शालिवाहन काळात राजा कर्णदेव याने या मंदिराचे पहिले बांधकाम केले. त्यानंतर काळाच्या ओघात अनेकवेळा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. जेव्हा सतीच्या दग्ध शरीराचे तुकडे नारायणांनी केले. तेव्हा तिचे तिन्ही नेत्र याच ठिकाणी पडल्याचेदेखील सांगितले जाते. परिणामी हे स्थान शक्तिपीठ म्हणून ख्याती प्राप्त झाली आहे. अनेक राजांनी, राजघराण्यांनी नवसपूर्तीच्या निमित्ताने या मंदिराला भरघोस दान दिले आहे. त्यामुळे अंबाबाई नवसाला पावतेच अशी भक्तजनांची पूर्ण श्रद्धा आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अंबाबाई सर्वांचे आयुष्य मंगलमय करो, याच नवरात्रीच्या शुभेच्छा.