मागील २ वर्षांपासून माटुंग्यातील कमला रामन नगरमध्ये पाण्याचा दुष्काळ!
गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त
18-Sep-2023
Total Views | 29
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये आतापर्यंत सुमारे १४०८३८३ दशलक्ष लिटर्स पाणीसाठा असून आजच्या दिवशी २०२२ मध्ये हा पाणीसाठा १४२५९३३ दशलक्ष लिटर्स तर २०२१ मध्ये १४३२२६८ दशलक्ष लिटर्स असल्याची नोंद आहे. मात्र असे असले तरी मागील तब्बल दीड ते दोन वर्षांपासून माटुंगा येथील कमला रामन नगर येथील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याची माहिती येथील नागरिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना दिली.
कमला रामन नगर येथील चाळीतील तब्बल ४०० घरांना मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसून पाण्याचे ३ महिन्यांचे बिल मात्र सुमारे ७ ते ८ हजार येत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे. तसेच सेंट्रल रेल्वेच्या हद्दीत जरी आमची चाळ येत असली तरी पाणीपुरवठा हा पालिकेकडून करण्यात येत असून धारावीतून आमच्याकडे पाणी वळवण्यात आल्याची माहिती देखील येथील स्थानिकांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात पालिका स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असल्याचीही माहिती येथील स्थानिकांनी दिली आहे.
२ वर्षांपासून पाणी नाही मिळत
पहाटे ४ वाजल्यापासून पाणी येण्याची वाट बघत आम्हाला बसावे लागते. तब्बल २ वर्षांपासून आम्हाला पाणी मिळत नाही. आणि जेव्हा पाणी येते तेव्हा त्याला फोर्स देखील नसतो.
- मनीषा सुत्रावे
मीटर तपासण्यास कोणी येत नाही
पाणी फोर्सने येत नसून पाणी अगदी गढूळ येते. ८ ते १० हजार पाण्याचे बिल पालिकेकडून येते मात्र पाणीच येत नाही. आमचे मीटर तपासण्यास देखील कोणी अधिकारी किंवा कर्मचारी येत नाहीत.
- वनिता रांगणेकर
दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
पाणी अतिशय गढूळ येत असून पाण्याला प्रचंड दुर्गंध देखील येतो. या अशा पाण्यामुळे लहान मुले आजारी देखील पडत आहेत.
- मनीषा सर्वोदय
रेल्वेकडून एनओसी नाही
नवीन पाईपलाईन टाकण्यास रेल्वेकडून एनओसी देण्यात येत नसून पालिका अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बोलणे सुरु आहे. तसेच यासंदर्भात पालिकेकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.