मराठवाड्याला चालना देणारे निर्णय घेणार : अजित पवार
16-Sep-2023
Total Views |
छत्रपती संभाजीनगर : मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात येणारे निर्णय हे मराठवाड्याला चालना देणारे असतील असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे राज्य मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. यावेळी मराठवाड्यासाठी अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर गुजरातला जाणारं अतिरीक्त पाणी मराठवाड्यात वळवण्याचा विचार ही असल्याचं अजित पवार म्हणाले.
"महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने एक रुपयात पिक विमा सुरु केला आहे. कृषीमंत्र्यांनी सूचना देखील दिल्या आहेत. मराठवाड्यातील सर्व नेत्यांनी मराठवाड्याला न्याय देण्याचा निर्णय घेतला. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या काळातही अनेक कामं करण्यात आली आहेत. गुजरातकडे जाणार अतिरीक्त पाणी मराठवाड्यात कसं वळवता येईल हा आमचा विचार आहे. पालघर आणि ठाण्यातील पाणीही वळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नदीजोड प्रकल्पही केले जाणार आहेत. महायुतीच सरकार विकास हाच एकमेव अजेंडा यावरती काम करत आहे." असं अजितदादा म्हणाले.
भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगताना अजित पवार म्हणाले, "शासनाच्या अनेक विभागांमध्ये तातडीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. काही विभागात तात्पुरत्या स्वरुपात बाहेरुन कंत्राटी भरती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण तात्काळ भरती करता येत नव्हती. मात्र आम्ही सर्वजण कायमची भरती करणार आहे. विरोधक काहीही मुद्दा काढतात, भडकवण्याच काम करतात. मात्र त्यांना त्यांचं लखलाभ." असे अजित पवार म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.