रा.स्व.संघाच्या बैठकस्थानी महत्त्वपूर्ण प्रदर्शनीचे आयोजन

सरसंघचालकांसह उपस्थितांनी दिली भेट

    15-Sep-2023
Total Views |

RSS Pradarshani

मुंबई :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचा प्रारंभ गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी पुण्यात झाला. एस.पी.कॉलेज येथे सुरु झालेल्या या तीन दिवसीय बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे बैठकस्थानी निरनिराळ्या विषयांवर आधारित माहितीपूर्ण अशी प्रदर्शनी मांडण्यात आली आहे. सरसंघचालकांसह देशभरातून बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी या प्रदर्शनीला भेट दिली.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त शिवचरित्राची ओळख करून देणारी एक प्रदर्शनी याठिकाणी ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये एका हातात राजदंड तर दुसऱ्या हातात तलवार असलेला छत्रपती शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळाही ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच शिवरायांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग, इतिहासकार विजयराव देशमुख, वा. सी. बेंद्रे आदी मंडळींनी केलेले त्यांचे वर्णन, शिवकालीन पत्रांचे दाखले, कवी भूषण यांचे काव्य तसेच छत्रपती शिवरायांवरील पोवाडे, महाराजांनी उभारलेले आरमार, त्यांनी लिहिलेल्या पत्रांचे अनुवाद तसेच हिंदवी स्वराज्यातील गडकोट, ‘शिवभारता’तील काही वर्णने, महाराजांचे ‘आज्ञापत्र’ अशी बहुमूल्य माहिती या प्रदर्शनीतून मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनीमधील छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा इतिहास जागविणारे ‘भक्ती शक्ती संगम’ हे शिल्प विशेष आकर्षण ठरत आहे.


शिवाजी महाराज
 
‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेनेसुद्धा आपला सहभाग या प्रदर्शनींद्वारे दर्शविला आहे. ‘स्वातंत्र्य संग्रामातील जनजाती नायकांचे योगदान’ याविषयावरील प्रदर्शनी त्यांच्याकडून तयार करण्यात आली आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या जनजाती समाजाने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यांचे बलिदान याबाबत माहिती देणारी ही प्रदर्शनी आहे. विविध संघटनांनी एकत्र येऊन प्रारंभ केलेल्या ‘स्वावलंबी भारत अभियान’ या विषयावरील प्रदर्शनी बैठकस्थानी मांडण्यात आली आहे. बेरोजगारी, गरिबी मुक्त आणि समृद्धी युक्त, स्वावलंबी भारताची निर्मिती हे या अभियानाचे लक्ष्य आहे. आर्थिक, सामजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या ३० संस्थांचा सहभाग या अभियाना अंतर्गत असून त्यांच्याकडून देशभर सुरू असलेल्या कार्याची माहिती प्रदर्शनीद्वारे मांडण्यात आली आहे. यशस्वी नवउद्यमींच्या कथादेखील या प्रदर्शनातून सांगण्यात आल्या आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.