मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रातील ५३०९ घरांसाठी लवकरच सोडत निघणार आहे. यासंदर्भात म्हाडाकडून लवकरच जाहिरात प्रसिध्द केली जाणार आहे. दि. १५ सप्टेंबर २०२३ पासून ऑनलाईन अर्जविक्री स्वीकृतीस सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःचे घर विकत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या कोकण मंडळातील एकूण ५ हजार ३०९ घरांसाठी लवकरच सोडत निघण्याची शक्यता आहे. येत्या दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सोडतीसंदर्भात जाहिरात निघण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० सदनिकांचा समावेश आहे. तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ सदनिका, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका तर कोंकण मंडळाच्या प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेल्या २२७८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या योजनेतील शेवटची सदनिका विकली जाईपर्यंत नोंदणीकरण आणि अर्ज भरणा प्रक्रिया सुरू राहील. या योजनेतील सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ०२२ - ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन म्हाडातर्फ करण्यात येत आहे.