ठाणे : कळवा पूर्वेतील रिक्षा थांब्यांवर नशेच्या पदार्थांचे सेवन करणाऱ्या रिक्षा चालकांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याबाबतचे वृत्त 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर कळवा पोलिसांनी तातडीने छापेमारी करून गर्दुल्या रिक्षाचालकांसह तीन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली.
कळवा पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा थांब्यांवर रिक्षाचालक मादक पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधील रिक्षा चालक नशा करून रिक्षा चालवत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच कळवा पोलिसांनी कारवाई करून रिक्षाचालक विनोद गुप्ता (४३) रा. भास्करनगर,कळवा पुर्व, गजानन साळूखे (२२),रा.शांतीनगर, मोहम्मद युसुफ शेख (२४)वय रा. मफतलाल झोपडपट्टी या तिघांना अटक केली.