महायुती सरकार लोकांची कामे अडविणारे सरकार नाही: फडणवीस
11-Sep-2023
Total Views |
नागपुर : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांची विविध विभागांतील कामे एकाच ठिकाणी व्हावी, यासाठी महायुती सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. नागपुरातील वाठोडा भागात आज (११ सप्टें.) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार लोकांची कामे अडविणारे सरकार नसल्याचे मोठे विधान करीत महाविकास आघाडीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "यापूर्वीच्या सरकारमध्ये लोकांची कामे अडत होती. विविध शासकीय विभागांमध्ये कामासाठी लोकांना विनाकारण चकरा माराव्या लागायच्या. त्यावेळी त्यांची कामे करताना अडवणूक व्हायची. परंतु याचे तत्कालीन सरकारला काही घेणेदेणे नव्हते. ‘महाराष्ट्रातील युतीचे सरकार हे लोकांची कामे करणारे सरकार आहे. आम्ही लोकांची कामे अडविणारे सरकार नाही." असं ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान फडणवीसांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचे तोंडभरुन कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खोपडे यांनी एक-दोन नव्हे तर आपल्या मतदारसंघात तब्बल सात विविध शिबिरांचे आयोजन केले. त्यातून सुमारे ३५ ते ४० हजार नागरिकांना लाभ देण्यात आला होता. फडणवीस म्हणाले की, "आमदार खोपडे यांची ‘कन्व्हिंसिंग पॉवर’ इतकी आहे की, त्यांनी ठरविले की नागपुरात समुद्र आणायाचा तर ते जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडून कामे करवून घेऊ शकतात." नागपुरात भविष्यात आणखी उड्डाणपूल, अंडरपास, सिमेंटचे रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या विकासाची ग्वाहीच जाहीरपणे यावेळी फडणवीसांनी दिली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.