मुंबई : ''उद्धव ठाकरेंचे सरकार पडण्याच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आणि मंत्री यांनी महायुतीसोबत सरकार बनवण्यासाठी मागणी केली होती. आमच्यावर काही मंडळी भाजपसोबत जाण्यावरून आरोप करत आहेत. त्यांना माझे खुले आव्हान आहे ही बाब जर खोटी असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईल. मात्र, ही हे जर खरे असेल तर तुम्ही राजकारणातून निवृत्त व्हा,'' असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवार गटाचे प्रमुख खासदार शरद पवारांना आव्हान दिले आहे.
नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपले काका शरद पवार यांच्यासह पवार गटातील नेत्यांवरही शरसंधान केले आहे. शिवसेनेच्या नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हा प्रश्न समोर आला आहे. पक्षातील बंडाळीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवारांमध्ये सुरु झालेल्या संघर्षात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महायुतीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून पवार काका पुतण्यात पुन्हा एकदा ठिणगी पडली असून कोल्हापूरच्या सभेत अजित पवारांनी यावर टिप्पणी केली आहे.