मेळघाट सपोर्ट ग्रुप

    06-Jun-2023
Total Views | 69
Article On Melghat Support Group

मेळघाटचा, परिसर निसर्ग सौंदर्याने संपन्न असला तरी वर्षानुवर्षे आरोग्य समस्या आणि कुपोषण यांसारख्या विविध समस्या त्या परिसरात भेडसावतात. येथे अनेकजण समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, काहीजण वेगळ्या प्रकारे यावर मार्ग शोधत आहेत. संपूर्ण बांबू केंद्राचे सुनील देशपांडे व निरुपमा देशपांडे गेले २८ वर्षं या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा समाजोपयोगी कामास ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’च्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांनी पुणे शहर व परिसरातून विविध प्रकारची मदत मिळवून दिली आहे. त्याविषयी...

मेळघाट सपोर्ट ग्रुप’ या सामाजिक बांधिलकी असलेली संघटनेतर्फे १९९५ पासून सुनील व निरुपमा देशपांडे यांच्या माध्यमातून चालविलेल्या संपूर्ण बांबू केंद्रास प्रामुख्याने पूर्णपणे सहकार्य केले जाते. २० मित्र व त्यांच्या कुटुंबांच्या सहकार्याने या संघटनेचे काम चालू आहे. मेळघाट परिसर नैसर्गिक वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा येथे आढळून येतात. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात हा परिसर येतो. मेळघाट वेगवेगळ्या वनस्पतींचा सोयरा आहे. येथे ६६८ प्रकारचे वृक्ष, वेली, झाडे, झुडपे आढळून येतात. वृक्षवेली व प्राणी याप्रमाणे पक्षीवैभवही तितक्याच गुण्यागोविंदाने बागडत आहे. मेळघाटचा परिसर सातपुड्याच्या पर्वत रांगांच्या दक्षिण भागात येतो.

मेळघाट म्हटले की, वर्तमानपत्रातूनआरोग्याची अनास्था, कुपोषण, रोजगार समस्या व महिलांचे शोषण यासारख्या बातम्या ठळकपणे येतात. सुनील देशपांडे व त्यांना साथ देणार्‍या त्यांच्या धर्मपत्नी डॉ. निरुपमा देशपांडे. शहरात राहण्याचा मोह सोडून मेळघाटाच्या जंगलात राहण्याचे आयुष्य व्यतीत करण्याचा निश्चय केला. दोघांनी मिळून लवादासारख्या परिसरात स्वतःच्या कार्यातून वेगळे जग निर्माण करावे ही अशक्य वाटणार्‍या पण शक्य करून दाखवणार्‍या उत्तुंग मनोबल असणार्‍या कार्यकर्त्याची गरुड झेप आहे आहे. संपूर्ण बांबू केंद्राचे केंद्राचे काम सर्व लोकांपर्यंत पोहोचवणेह ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’च्या कामाचा उद्देश आहे.
संपूर्ण बांबू केंद्रातर्फे बांबूपासून राखी बनवल्या जातात. ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’च्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये राखी कीटसचे वितरण करण्यात येते. बांबूपासून तयार केलेल्या राख्या शाळांमध्ये जाऊन मुलांना राखीचे महत्त्व त्यांच्यापर्यंत राख्या पोहोचवल्या जातात. याचबरोबर मुलांना मेळघाटातील संस्थेच्या कामाची माहिती दिली जाते.

विविध कंपन्या, सोसायटी, शाळा, जत्रा, महोत्सव यात प्रदर्शनी स्टॉल लावून बांबूच्या वस्तू व राख्यांची विक्री केली जाते. पुणे येथील एका केंद्रात वर्षभर सर्व राख्या व वस्तू उपलब्ध आहेत.संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून बांबू हस्तकला, फर्निचर, ज्वेलरी, गृहनिर्माण प्रशिक्षण, बांबू लागवड, डिझाईन विकास, विविध विकास योजना व महिला सक्षमीकरण असे उपक्रम राबवली जातात. त्याबद्दलही माहिती सपोर्ट ग्रुप लोकांना देत असते. मेळघाट सपोर्ट ग्रुप संपूर्ण बांबू केंद्राचे सहकारी म्हणून का कार्य करते तर? बांबूसारखा एरवी कमी महत्त्वाच्या वाटणार्‍या एखाद्या विषयासाठी सारे जीवन समर्पित करण्याचा निर्णय देशपांडे दाम्पत्याने घेतला. या निर्धाराच्या पूर्तीसाठी झपाटलेपणाने काम करून संपूर्ण बांबू केंद्र नावाच्या संस्थेची १९९५ साली उभारणी केली. रोजगाराअभावी सातत्याने कुपोषणाचा सामना करणार्‍या मेळघाटात देशपांडे दाम्पत्याने उभे केलेले संपूर्ण बांबू केंद्र जंगलावर अवलंबून असलेल्या वनवासी बांधवाना नव्हे, तर सर्व मेळघाटला रोजगाराच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारा हा नावीन्यपूर्ण प्रयोग आहे.

मेळघाटमधला समाज कोणाकडे भीक मागत नाही. त्याच्या प्रश्नांवर, समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे, असा ध्यास सुनील आणि निरुपमा देशपांडे यांनी घेतला. या लोकांना काम मिळावे म्हणून मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूला त्यांनी माध्यम बनवले. सुनील यांनी लोकोपयोगी कामाचा वारसा घेतला विनू काळे यांच्याकडून. महेश नानाजी देशमुख यांच्याबरोबर केलेल्या चित्रकूट व पुढे डॉक्टर शर्मा यांच्याबरोबर झारखंड येथे केलेल्या कार्याचा अनुभव पाठीशी होता. बांबूमध्ये काम करणारे व्यक्तीला ‘बसोड’ म्हणतात. बांबू केंद्राच्या माध्यमातून स्थानिक बांबू कारागिरांच्या परंपरागत कौशल्याला प्रशिक्षणाची जोड देऊन बांबूच्या विविध आकर्षक वस्तू तयार करणारे कारागीर आता तयार होत आहेत. गावातील कोरकू, भिल्ल,गौड अशा वनवासी समाजातून दहा हजार पारंपरिक बांबू कामगारांना प्रशिक्षण दिले आहे. भारतीय संस्कृती व संवर्धना करता ग्रामज्ञानपीठाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामज्ञानपीठ येथे आठ एकर जमिनीवर ‘स्किल डेव्हलपमेंट’करिता सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभे केले आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले जाते.

घुंगरू बाजार दिवाळीनंतरचा पहिला शनिवार, रविवार आयोजित केला जातो. २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान सिपना शोध शिबीर आयोजित केले जाते. ३१ डिसेंबरला पंचायत भरवली जाते. यात जलसंपदा, नभ संपदा यांचा अभ्यास केला जातो. तसेच, पंचक्रोशीत काय कामाची गरज आहे अशी विचारणा केली जाते व त्या प्रश्नाचे निवारण करण्यासाठी मदत केली जाते .होळी नंतरच्या पहिल्या शनिवारी व रविवारी माघ वद्य त्रयोदशीला फगवा महोत्सव सादर केला जातो . २०१७ मध्ये ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’ व ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे’ यांच्या माध्यमातून‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांनी तेथे भेट दिली. ही मुले बांबूच्या उत्पादनाचा अभ्यास करतात व त्याकरता वेगवेगळे डिझाईन व नवीन कल्पना़ सुचवतात. त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनबनवलेले सोलर दिवे पाच खेड्यात बसवण्यात आले आहेत. मेळघाटातीलमहिलांकरिता स्वच्छता हा विषय अग्रक्रमानेठेवला गेला आहे. तरी सार्वजनिक स्वच्छता जशी महत्त्वाची आहे तशी शारीरिक स्वच्छता ही महत्त्वाची आहे.

मेळघाटातील महिलांकरिता बांबूची स्नानगृहे उभारण्यात आली. काही स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छतागृह उभी करण्याकरिता मदत केली गेली. नंदुरबार येथील वनवासी पाड्यात ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’तर्फे स्वच्छतागृहे उभी करण्यात आली.तसेच, कोरोना काळात मेळघाटातील वनवासीपाड्यावर कारागीर व सामान्य जनता यांसाठी धान्यांचे किटस व कोरोना प्रतिबंधक किटसचे वाटप करण्यात आले. दरवर्षी, मे महिन्यात ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’तर्फे गरवारे शाळेत संपूर्ण बांबू केंद्राच्या कारागिरांनी तयार केलेल्या बांबूच्या ६० हून जास्त कलाकृतीचे प्रदर्शन भरवले जाते. प्रत्येक वर्षी मे महिन्यात पुणे शहर व परिसरातील लोकांनी वापरलेले किंवा नवीन कपडे यांचे संकलन केले जाते व जे कपडे वापरण्या योग्य नाहीत अशा कपड्यांमधून गोधडी, सतरंज्या पायपुसणी व पिशव्या शिवून बचत गटांतील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. याशिवाय आपले आयुष्य समाजकारिता देणार्‍या किंवा सामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या अनेक समाज महारथींचा परिचय या तीन दिवसांत करून दिला जातो.

२०१८ साली स्वामी देव सेवानंद यांचा नर्मदा तीरावरील आश्रम आहे त्यांचा परिचय करून देण्यात आला. तसेच, झाबूआसारख्या दुर्गम भागात सर्व लोकांना सोबत घेऊन जलसंधारणाची कामे करणार्‍या ‘शिवगंगा अभियाना’चे श्री महेश शर्मा यांचा २०१९ मध्ये परिचय करून देण्यात आला. २०२२मध्ये नर्मदालयाच्या भारती ठाकूर यांची मुलाखतआयोजित करण्यात आली. नगरच्या मौजेवाडी येथील ग्राम परिसरात २५० भाकड गाई व २०० अनाथ मुला मुलींसाठी वसतिगृह चालविणार्‍या ‘दत्त योगीराज’ संस्थेचा परिचय करून देण्यात आला. यावर्षी २०२३ मध्ये वायनाड येथे वनवास क्षेत्रात ४० वर्षे अखंड वैद्यकीय सेवा देणारे विवेकानंद मेडिकल मिशनचे डॉक्टर धनंजय सखदेव यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला.डॉ. संगदेव यांना वैद्यकीय सेवेबद्दल २०२१ साठी भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन गौरवले. तसेच संस्थेतर्फे टाकाऊतून टिकाऊ या संकल्पना आधारित सर्वत्र वापरण्यात येणार्‍या प्लास्टिकचे पुनर्वापर करण्याचा नवीन उपक्रम संस्थेने ‘रुद्र’ संस्थेच्या सहकार्याने सुरू केला आहे.

‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’चे काम गेली आठ वर्षे चालू आहे. मिलिंद लिमये, राघवेंद्र देशपांडे, चिदंबर दीक्षित, विकास सिधये, महेश डबीर, अतुल फडके, डॉक्टर हिरेमठ, प्रमोद कुलकर्णी, विलास फाटक या सर्वांचा परिवार यांच्यासह अनेक इतर कार्यकर्ते यात मोलाचे योगदान देत आहेत. प्रत्येकाने आपल्या शिक्षणाचा उपयोग माणुसकी सिद्ध करण्यासाठी केला, तर एक सहृदयी समाज निर्माण होईल. सुनील व निरुपमाताईंसारखी माणसे सर्व प्रचलित जीवन सोडून आदर्श समाजासमोर निर्माण करत आहेत. तरी या मेळघाटाच्या वेणुपुत्राच्या कार्याला शतशत नमस्कार.

अधिक माहितीसाठी संपर्क
मिलिंद लिमये-८४२१८६४२९१
राघवेंद्र देशपांडे-७६६६८९३६५५
चिदंबर दीक्षित-९९२१४४३४४४


सचिन साठ्ये 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121