पीएफआय प्रशिक्षण सुरू असलेल्या 'त्या' शाळेबद्दल महत्वाचा आदेश!

    01-Jun-2023
Total Views |
Peoples Front of India Pune

पुणे
: पिपल्स फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) दहशतवादी प्रशिक्षण केंद्र चालविल्याप्रकरणी कारवाई झालेल्या ब्ल्यू बेल्स हायस्कूल अ‍ॅन्ड ज्यूनिअर कॉलेजमध्ये कोणीही प्रवेश घेऊ नये असे आवाहन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांनी केले आहे. या शाळेचे दोन मजले राष्ट्रीय तपास यंत्रणेने सील केले होते. तसेच, ही शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले होते.

ब्ल्यू बेल्स हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज, कोंढवा या शाळेतील इयत्ता ९ वी १० वीच्या माध्यमिक वर्गांना शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये अनधिकृत वर्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये अद्याप मान्यता नसल्याने या शाळेत प्रवेश घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय तपास संस्थेने ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले सील केले होते. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने कारवाई केली होती.

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी केलेल्या तपासणीमध्ये ब्ल्यू बेल्स शाळेच्या मान्यतापत्राची नोंद पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक नसल्याचे निष्पन्न झाले होते. या मान्यतापत्रावर तत्कालीन शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आलेली होती. शाळेचा मान्यता क्रमांक हा मेडिकल बिलाचा होता.

सेवा फाउंडेशनने २०१९ साली ब्ल्यू बेल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज सुरू केलं होतं. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग भरविले जात होते. शाळेमध्ये एकूण ३१२ मुले शिकत होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने कारवाई केल्यानंतर तात्काळ ही ही शाळा अनधिकृत घोषित करुन वर्ग बंद करण्यात आले होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.