लोकप्रतिनिधींना सक्षम करणार ‘ई – विधान’ : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल

    25-May-2023
Total Views |
Union Commerce Minister Piyush Goyal

नवी दिल्ली : संसदीय लोकशाही हा भारताच्या विकासाचा आणि भविष्याचा पाया आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन म्हणजे सार्वजनिक हितासाठी अत्याधुनिक तांत्रिक प्रगतीचा लाभ घेण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा दाखला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच केले आहे.

केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले,देशभरातील संस्था मजबूत करणे आणि संस्थांमधील पारदर्शकता वाढवणे आवश्यक असून राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन आपल्या लोकप्रतिनिधींच्या सक्षमीकरणाचा प्रकल्प आहे राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन आमदारांना केवळ त्यांच्या संबंधित विधानसभेचीच नव्हे तर इतर विधानसभेतील घडामोडींची माहिती आणि ज्ञान देऊन सक्षम करणार आहे. राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन द्वारे होणाऱ्या माहितीच्या आदान- प्रदानामुळे, ज्ञानाची देवाणघेवाण होईल आणि राज्यांमध्ये सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब होईल, असेही त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या डिजिटल भविष्याची कल्पना केली असल्याचे केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रत्येकाने कर्तव्याची मानसिकता ठेवून काम केले तरच हे ध्येय गाठता येईल. या कर्तव्याच्या भावनेला पुढे नेण्यासाठीच राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन विकसित करण्यात आले आहे. राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लीकेशन भारताच्या लोकशाहीमध्ये आणि भारतीय विधिमंडळ आणि संसदीय कामकाजात खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणणार आहे. त्याचप्रमाणे यामुळे कार्बन उत्सर्जन तसेच विधिमंडळाच्या कामकाजामधील कागदाच्या वापरामुळे असलेली अकार्यक्षमता प्रभावीपणे कमी होईल, असेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी यावेळी नमूद केले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.