‘वंदे मातरम्‌‍' आणि ‌‘जय सावरकर'च्या निनादात निघाली ‌सावरकर दौड

    21-May-2023
Total Views |
Savarkar Daud pune
 
पुणे : ‌‘वंदे मातरम्‌‍', ‌‘भारत माता की जय', ‌‘तुमचे आमचे नाते काय; जय भवानी जय शिवराय' आणि ‌‘जय सावरकर' अशा घोषणांनी आसमंत निनादला. निमित्त होते स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि विवेक व्यासपीठ यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. 21) ‌‘सावरकर दौड'चे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त राज्य सरकाराने महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक, सामाजिक तसेच सामूहिक कार्यक्रमांचे नियोजन करून सावरकर सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. सावरकर सप्ताहाची सुरुवात पुण्यात ‌‘सावरकर दौड'ने करण्यात आली. ‌‘सावरकर दौड'मध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

‌‘सावरकर दौड'चा प्रारंभ सकाळी 7:30 वाजता फर्ग्युसन महाविद्यालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त व कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), सुप्रसिद्ध सिने अभिनेते सौरभ गोखले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक अक्षय जोग, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक श्रीनिवास कुलकर्णी, कसबा विभाग पुणेच्या महिला आघाडी प्रमुख अश्विनी कुलकर्णी, सचिव कृष्णा वैद्य, पुणे शहर चिटणीस विक्रम दिवाण, पुणे शहर संपर्क प्रमुख श्रीराम जोशी, वारजे विभाग प्रमुख यज्ञेश गांधलीकर, पिंपळे गुरव विभाग प्रमुख शुभम कातंगळे, विशाल कुलकर्णी, भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्यासह अनेक सावरकरप्रेमी उपस्थित होते.

 
Savarkar Daud pune


सावरकर दौड फर्ग्युसन महाविद्यालय - ज्ञानेश्वर पादुका चौक - मॉडर्न महाविद्यालय - बालगंधर्व - डेक्कन जिमखानामार्गे जाऊन सावरकर दौडचा समारोप सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेसमोरील सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे झाला.सावरकर हे दूरदृष्टी असणारे नेते होते, असे सांगून ‌‘सावरकर आणि सैनिकीकरण' या विषयावर बोलताना ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) म्हणाले, आज पाकिस्तान आणि चीन भारताविरूद्ध हायब्रीड युद्ध लढत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ते भारताशी लढत आहेत. त्या विरूद्ध उभे राहण्यासाठी जो सैनिक लागणार आहे तो एक सामान्य नागरिक आहे. आजचे युद्ध हे युद्धभूमीपुरते मर्यादित राहिलेले नाही ते माहितीच्या, सामाजिक गोष्टींच्या, समाजामनाच्या विरूद्ध पुकारलेले युद्ध आहे. ईशान्य भारतातून बांगलादेशींच्या घुसखोरीचा धोकाही सावरकरांनी फार पूर्वीच ओळखून त्याविषयी सावध केले होते. ही घुसखोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करणे ही आता सामान्य नागरिकाची जबाबदारी आहे. कारण बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे.


Savarkar Daud pune


सावरकर यांचे नातू रणजित सावरकर म्हणाले, सावरकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन दोन पावले तरी चालण्याची आज गरज आहे. सावरकरांनी आर्थिक युद्धनितीचा पुरस्कार केला असल्याचे त्यांनी सांगितले. मंजिरी मराठे म्हणाल्या, सावरकरांनी हिंदूसंघटन महत्त्वाचे मानले. त्यांचे संख्याबळ हेच खरे बळ आहे असे सावरकर यांचे विचार आहेत. ते हिंदूंनी समजून घेतले पाहिजेत. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, प्रत्येक नागरिकाच्या मनात आपण या हिंदू राष्ट्राचे सैनिक, संस्कृतीचे पूजक, सरस्वतीचे पुत्र आहोत याची जाणीव झाली पाहिजे.

फर्ग्युसन महाविद्यालयात ‌‘सावरकर दौड'चा प्रारंभ झाल्यानंतर सौरभ गोखले म्हणाले, महापुरुषांच्या नावाचा, कर्तृत्वाचा वापर राजकारणासाठी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. मात्र त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून कार्य झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.श्रीनिवास कुलकर्णी यांनी ‌‘सावरकर दौड'च्या आयोजनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले तर आभार नेहा गाडगीळ यांनी मानले.‘सावरकर दौड'च्या यशस्वीतेसाठी अजित कुलकर्णी, भक्ती कुलकर्णी, निशिगंधा आठल्ये, अविनाश कुलकर्णी, नितीन गोडबोले, ऋचा गोडबोले, अतुल रेणावीकर, अतुल सोमण यांनी परिश्रम घेतले.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.