स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याचा उद्घोष करणारी मराठी कविता

    20-May-2023
Total Views |
Marathi poem in the pre-independence era

हिंदुस्थानात इंग्रजांचे राज्य आल्यानंतर मराठी कवितेवर इंग्रजी साहित्याचा प्रभाव पडू लागला. सन १८३३ मध्ये हरी केशवजी यांनी इंग्रजी कवितेला मराठी रूप देण्याचा प्रयत्न केला. सन १८६० व १८६१ मध्ये महादेव शास्त्री यांनी इंग्रजी कवितांच्या मराठी भाषांतराची पुस्तके प्रसिद्ध केली. त्यामुळे कवितेत स्वातंत्र्याची लालसा, अन्यायाला प्रतिकार, मानवी समता, निसर्ग हे विषय येऊ लागले. तत्पूर्वी कथाकाव्ये, भक्तिरस हा प्रामुख्याने काव्यात येत होता. तेव्हा, स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्याचा उद्घोष करणार्‍या अशाच काही मराठी कवितांचा घेतलेला हा रसास्वाद...

स्वातंत्र्याची उर्मी जनमानसात रुजवण्याचे कार्य अनेक कवींनी केले. बहुतांश कवी ऐतिहासिक घटनांवर पोवाडे आणि कविता रचत. पोवाड्यामध्ये तर सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, समता, अन्याय अशा विषयांची सरमिसळ होती. राष्ट्रीय कविता, देशाचे स्वातंत्र्य केंद्रभूत मानून कविता करणारे व ऐतिहासिक घटनांवर कविता करणारे असा फरक करावा लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात जसे कवितेतून राजा इंग्रजांविरुद्ध बंड करणारे कवी होते, तसेच राजनिष्ठ किंवा अतिरक्त राजनिष्ठा दर्शविणारे काही कवी होते. सरकारच्या बडग्यामुळेही कवींवर मर्यादा आल्या होत्या.

महादेव मोरेश्वर कुंटे (सन १८३५ ते १८८८) कोल्हापूर यांनी ‘राजा शिवाजी’ हे काव्य लिहिले. त्यांनी नेहमीच्या संस्कृतप्रचुर शब्द योजनेला तिलांजली देत या कवितेत मराठी शब्द योजना करून मराठी धाटणी दिली.त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. इ. सन१८५७च्या स्वातंत्र्यसमरात कानपूरमध्ये इंग्रजांची कत्तल झाली. त्यात बायकामुलेही मारली गेली. त्यामुळे ते संतप्त झाले. इंग्रजांच्या क्रोधाचे, त्यांनी केलेल्या संहाराचे वर्णन कवी करतो व त्यात ज्या शुरांनी हे कृत्य केले, त्यांचा धिक्कारही करतो.
चिंतामणी पेठकर (१८५१ ते १८७९) यांची ही कविता त्याचा प्रत्यय देते-
धिक त्या शुर जनांस, धिक त्यांच्या शुरते;
पोरे अज्ञ तशा स्त्रिया हि अबला जी संहाराया रते,
तपे व्याघ्र वधु जशी स्व पृथका चोरून नेता क्षणी,
किंवा तीव्रतरे जसा खवळतो दंड प्रहरे फणी;
क्रोधाने परतंत्र होऊन तसे, या इंग्लीशांनी किती,
निर्दोषी जना दिले, निज महाक्रोधानली आहुती!
शस्त्रे हीन करून, एकसरिने बांधून मेंढ्या परी,
गोळ्यांनी वधिले किती जन! किती टांगुनी वृक्षावरी
गंगाधर रामचंद्र मोगरे (१८५७ ते १९१५) यांचा देशाभिमान आणि भाषाभिमान कसा प्रखर होता, हे दिसून येईल-

...अस्तित्वावर तुमच्या भाषेच्या,जो चहुकडूनी घाला
पडला संप्रति आहे कोण,तुम्हा विण निवारिता त्याला?
हिंदी म्हणते, माझा सर्वावरी चालवीन मी पगडा,
आमरणात तिथे तो, उर्दू म्हणते, करीन मी झगडा,
मी लाडकी नृपाची, हो मज सांगेल कोण माघारी?
ऐसे म्हणुनी दारे बसली, अडवून इंग्रजी सारी....
म्हणजे तेव्हापासूनच इंग्रजी भाषेचा कसा प्रभाव पडत होता, हे या कवितेतून दिसून येते. भारतीय भाषांची सद्यस्थिती आपण पाहतोच आहोत. सुरुवातीच्या काळातील कवी विनायक हे केशवसुतांचे (१८६६ ते १९०५) समकालीन कवी होते. पारतंत्र्यात असलेल्या भारतमातेचे वर्णन त्यांच्या कवितेत आले आहे- तळहाती घेऊन स्व-शिराते बैसली
कवी केशव सुत यांनी तर... राष्ट्रत्वाला फिरुनी अमुचा देश येईल केव्हा? आणि... आम्हा डोळे नसती बघण्या, पारतंत्र्यामुळे हो अशी खंत व्यक्त केली. कवी गोविंदाग्रज (रामगणेश गडकरी १८८५ ते १९१९)राष्ट्रप्रेमाने भरलेले कवी होते.
हरी गुरूनाथ सलगरकर कुलकर्णी (१८९६ ते १९८१) म्हणजे कवी कुंजविहारी यांनी नऊ महिन्यांनी ही प्रसिद्ध कविता लिहिली.
सानेगुरुजी (१८९९ ते १९५०) उज्ज्वल निर्मला, हे भारत वर्षा, हे मंगल देशा,उठ झुगारून देई बेडी आणि जा रे पुढे व्हा रे पुढे...या कविता महत्त्वाच्या आहेत.
कवी दत्त व त्यानंतरच्या पिढीतील स्वा. विनायक सावरकर आणि कवी गोविंद त्र्यंबक दरेकर यांनी मेळ्यातील पदे, पोवाडे व स्वातंत्र्यतेचा गजर करणारी काव्यरचना केली. सन १८९९ साली नाशिकमध्ये ‘मित्रमेळा’ स्थापन झाला. त्याचे अग्रणी होते विनायक दामोदर सावरकर (१८८३ ते १९६६) आणि कवी गोविंद (१८७४ ते १९२६) सातत्याने स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे हे दोन कवी...

लाल-पोलादी हे देव जणू भासती,
राष्ट्र हित साधण्या जन्म घेती
लाल पंजाबचा, पाल बंगालचा,
बाल तो शोभावी पुण्य नगरी
अशा अर्थाची कवने लिहिली जात. त्याकाळी स्वदेशीचा वापर म्हणजे गुन्हा होता. त्याला समर्पक असे संवाद पद तयार झाले...
पहिली :- देशी खणाचा, परकर साचा! सुंदर नामी पहा,
दुसरी :- बोलू नको साळू ऐसे राज ग द्रोह हा!
कवी गोविंद यांची कविता याच सुमारास बहरात आली. बाबाराव सावरकरांनी ती गुप्तपणे छापून प्रसिद्ध केली.
आठव्या पुष्पातील-
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना,
असा भूतकालीन सिद्धांत जाणा
स्वराज्ये च्छुने पाहिजे युद्ध केले,
रणाविण स्वातंत्र्य कोण मिळाल,
तर नवव्या पुष्पातील काव्यरचना बघा-
पुढे माजतील परके राक्षस
कोणी जरी अनिवार।
काळ्यांचा कलीराजा त्यांना
करील सिंधू पार...
बोधप्रद पुरातन मौज, शिवकालीन लोक मनोवृत्ती, रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले आणि श्री शिवास मावळ्यांची प्रार्थना या कविता (लघु अभिनव माला पुष्पे) बाबाराव सावरकर यांनी प्रसिद्ध केल्याने त्यावर राजद्रोह व राजाविरुद्ध बंड करणे, असे आरोप ठेवले गेले आणि बाबारावांना अडकविण्यासाठी ते एक निमित्त ठरले.

स्वतंत्रतेचा पण! कारागृहाचे भय कोणास? कान उघडणी, सुंदर मी होणार, कवी गोविंदांच्या अशा अनेक कविता गाजल्या.
स्वातंत्र्यपूर्वकाळात कवी गोविंदांचे योगदान हे देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. १९०५ ते १९०८ पोवाडे, समरगीते यांचा मेळ्यातून आणि उत्सवातून भरपूर वापर केला जाऊ लागला आणि स्वातंत्र्याचे पडघम वाजू लागले.
सावरकरांच्या कवितेत प्रवाही शब्दरचना, मातृभूमीबद्दलचे प्रेम, समर्पणाचे भाव दिसून येतात. महाराष्ट्र शारदेला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे सावरकरांची कविता. त्यांनी आपले सारे आप्तजन, घरदार व संपत्ती मातृभूमी चरणी वाहिले आहे, ते म्हणतात-

हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले
त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमत्ता
दावानलांत वहिनी नवपुत्रकांता
त्वत्स्थंडिली अतुल्-धैर्य वरिष्ठ बंधू
केला हवी परमकारुण पुण्य सिंधू
त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय बाळ झाला,
त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला

मातृभूमीप्रतीचा निस्सीम पूज्य भाव बघा
हे मातृभूमी, प्रिय पावन पुण्यभूमी,
हे आर्य भूमी, तुज वंदन धर्म भूमी
सर्वस्व अर्पण असो तुझियाच कामी,
व्हावे कृतार्थ, करुनी तुज, धन्य आम्ही
सन १९१०च्या दशकात स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेला वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील पोवाडा स्फूर्तीदायक आहे.

स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजी!
आम्ही गातसो श्री बाजीचा पोवाडा आजी!!
आणखी ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’, ‘सागरा प्राण तळमळला...’, तानाजीवरील पोवाडा महत्त्वाचा ठरतो. प्रतिकूल परिस्थिती असतानाही भयाचा उल्लेखही नसलेली कविता सावरकरांनी लिहिली. १९०८ ते १९१० या काळात मेळे, प्रभात फेर्‍या आणि पोवाडे थंडावले. कारण, वंगभंगाची देशव्यापी चळवळ सुरू झाली व क्रांतिकारकांच्या कारवाया वाढून त्याचे परिणाम टिळक, परांजपे, सावरकर यांना पकडण्यात झाले. सन १९२० साली लोकमान्यांचा अस्त झाला व गांधीयुग सुरू झाले. तेव्हा कविवर्य तांबे (१८७४ ते १९४७) यांनी महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाच्या व्रतावर उखळात दिले ‘शीर काय अता?’ ही कविता लिहिली. झाशीवाली ही राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील कविता-
रे हिंद बांधवा, थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत, मावळे इथे झाशीवाली.
प्रभात फेर्‍यातील पदे किती अर्थ पूर्ण होती, ते पाहा-
अरे ही गांधींची तकली,
इंग्लंडच्या बोकांडी बसली!!
ही खादी स्वदेशी,
जनाभूषवी, मना तोषवी!!
अद्भुत रणसंग्राम वीरा, अद्भुत रणसंग्राम!!...
अलंकाराने नटलेली आणि थोडी क्लिष्ट वाटणारी कविता पुढे थोडी मोकळी होत गेली आणि सर्वसामान्यांना आपलीशी वाटू लागली. यामध्ये अग्रेसर होते कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर. सन १९३६ साली लिहिलेली जालियनवाला बाग यातील...

पाचोळ्या परी पडली पाहून, प्रेतांची रास,
नयन झाकले असतील देवा, तू आपले खास
आणि त्याच साली लिहिलेली कविता ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ते
फिरता बाजूस डोळे किंचित ओले,
सरदार सहा सरसाउनी उठले शेले,
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले,
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात,
वेडात मराठे वीर दौडले सात!

सन १९३८ साली ‘जा जरा पूर्वेकडे’ तर, सन१९३९ साली क्रांतीचा जय जय कार, गर्जा जय जय कार क्रांतीचा ,गर्जा जय जय कार’ अन्

वज्राचे छातीवरती गया झेलून प्रहार
खळखळू द्या या अदय शृंखला हातापायात,
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
आणि
कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल
सरणावरती आज अमुची पेटताच प्रेते,
उठतील त्या ज्वाला तुनी भावी क्रांतीचे नेते

या कविता ज्वलंत देशप्रेमाने प्रेरित आणि वीररसाने रसरसलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात जनमानसात देशाभिमान जागृत करण्याचे काम तात्यासाहेबांच्या कवितेने केले. टिळकयुगात आणि त्यानंतरच्या गांधीयुगात राष्ट्रवादी कवींची परंपरा उदयास आली. स्वातंत्र्याबद्दची आंतरिक ओढ आणि जे कवी प्रत्यक्ष क्रांतीकार्यात भाग घेऊ शकत नव्हते, ते आपल्या काव्याद्वारे जनमानस पेटवून देण्याचे कार्य करीत. महाराष्ट्रातील कवींसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच १८५७चे स्वातंत्र्यसमर होते. त्याशिवाय, शिवरामपंत परांजपे (काळ), लोकमान्य टिळक (केसरी) यांची वृत्तपत्रे होती. शिवजन्मोत्सव, गणेशोत्सव यांसारख्या उत्सवांमुळे जनमानस ढवळून निघत होते. मेळ्यांमधील जोशपूर्ण स्वातंत्र्यसमर गीतांनी तरुणांच्या मनात देशभक्तीचे अंकुर फुटत होते.

माधव केशव काटदरे (कवी माधव) माधव जूलियन, वि. द. घाटे, कवी यशवंत वा. रा. कांत, भा. रा. तांबे, श्रीकृष्ण पोवळे अशा अनेक कवींनी कविता लिहिल्या. समर गीतांचे कवी आणि पोवाडे लिहिणारे, तर कीर्तन प्रवचनांतून समाजप्रबोधन करणारे अनेकजण या महाराष्ट्रदेशी होऊन गेले. सर्वच कवींचा उल्लेख करणे येथे शक्य नाही. पण, या ज्ञात-अज्ञात कवींचे योगदान महाराष्ट्रातील जनता कदापि विसरणार नाही.

सतिश मोहोळे

९४२१६०८१०४

(संदर्भ : आधुनिक मराठी कविता - ले.भवानी शंकर श्रीधर पंडित ,विशाखा- कुसुमाग्रज)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.