कौशल्य विकासात महाराष्ट्राचे कार्य नोंदणीय : जे पी नड्डा

"छत्रपति शाहू महाराज युवा शक्ति करियर शिबिरा"ला युवकांचा उदंड प्रतिसाद

    18-May-2023
Total Views |
jp nadda

मुंबई
: ''आज देशातील औद्योगिक क्षेत्र वेगाने बदलाच्या स्थितीतून जात असताना बदलत्या काळाप्रमाणे कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे आणि त्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण घेणे गरजेचे बनले आहे. देशातील कौशल्य विकासाची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना करत युवकांना समृद्ध बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रात चांगले काम होत असून कौशल्य विकासात महाराष्ट्राचे कार्य नोंदणीय आहे,'' असे गौरवोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे पी नड्डा यांनी काढले आहे.

गुरुवार, दि. १८ मे रोजी दादर येथील रवींद्र नाट्यमंदिरात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'छत्रपति शाहू महाराज युवा शक्ति करियर शिबिरा'त भाजपाध्यक्ष खासदार जे पी नड्डा बोलत होते. युवकांना मार्गदर्शन करताना जे पी नड्डा यांच्यसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार मनोज कोटक, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा लाख नोकऱ्या घोषणा दिली होती. ती घोषणा केवळ घोषणा न राहता दहा लाखांपैकी २ लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली असून त्यासोबतच १३ लाख युवक युवतींना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु असल्याचेही नड्डा यांनी यावेळी नमूद केले.

खासदार नड्डा म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वप्न पाहिले आणि कौशल्य भारत मिशनला देशात सुरुवात झाली. युवा पिढीला कौशल्य विकसित करताना पुनर्प्रशिक्षित करणे देखील तितकेच आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणात ६६ टक्के महिलांचा समावेश आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत १ कोटींहून अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले असून महाराष्ट्रातही हा कार्यक्रम वेगाने राबवला जात आहे. महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम राबवणे चांगली गोष्ट असून या जोडीने स्टार्टअपच्या माध्यमातूनही महाराष्ट्रासह देशभरात २५ लाख रोजगार निर्मिती झालेली आहे. स्टार्टअप आणि कौशल्य विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असून त्याची इकोसिस्टम बनवण्यासाठी शेकडो कोटींची तरतूदही केली आहे,' असे नड्डा यांनी यावेळी म्हटले आहे.

नड्डांसह मुख्यमंत्र्यांकडून मंगलप्रभात लोढांच्या कामाचे कौतुक

युवा संवाद कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कामाचे आणि प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक केले. ''मला युवा संवाद कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मंगलप्रभात लोढा आत्मीयतेने कामाला लागले असून विभागाचे काम पूर्णपणे तन्मयतेने करत आहेत. लोढा वरकरणी शांत दिसतात मात्र ते हाती घेतलेले काम पूर्ण ताकदीनिशी करतात.'' या शब्दांत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मंगलप्रभात लोढा यांचे कौतुक केले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लोढांच्या कामाला प्रोत्साहन दिले आहे. ''मी मंगलप्रभात लोढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मोठा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. लोढांच्या नेतृत्वाखाली त्यांची संपूर्ण टीम उत्तमपणे काम करत आहे. राजभवनात केलेल्या कार्यक्रमात एक लाख २५ हजार सामंजस्य करार करून त्या माध्यमातून ६० हजार युवक युवतींना रोज़गार उपलब्ध करून दिला असून २ लाख ८० हजार रोजगार या विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. येत्या काळात ३ लाख युवकांना रोजगार निर्माण करून देण्याचे उद्दिष्ट लोढांनी समोर ठेवले असून त्यांच्या या संकल्पाला आमच्या शुभेच्छा आहेत.' या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी लोढांच्या कामाचे कौतुक केले आहे.

जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जास्तीत जास्त रोजगार निर्मिती साठी राज्य शासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय, यामुळेच संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून पााचव्या क्रमांकावर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. सध्या देशात जी २०च्या बैठक सुरु आहेत. जी २०चे अध्यक्ष पद भारताकडे आहे ही देशासाठी गौरवाची बाब आहे.
''विद्यार्थ्यांना लागणारे शिक्षण, तसेच शिक्षणासाठी देण्यात येणारे अर्थ सहाय्य, शिष्यवृत्ती तसेच रोजगाराच्या विविध संधी, पालकांचे समुपदेशन या शिबिरात केले जाणार आहे.देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना राज्यात ७५ हजार नोक-या देण्याचे उद्दीष्ट आहे.बार्टी,सारथी व महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई महापालिका शाळांमध्ये स्कील डेव्हलपमेंट सेंटर सुरु करण्याची गरज लोढा यांनी व्यक्त केली होती. त्या धर्तीवर या अनुषंगाने १०० शाळांसोबत करार झाला असून लवकरच महापालिकेच्या शाळांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण मिळेल.' अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

युवा पिढीने कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनी चित्रफित माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाले,छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन आज राज्यातील सर्व मतदार संघात आयोजित केले आहे.या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून आपले युवक व युवतींना त्याचा नक्की फायदा होईल.या शिबीराच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची एकत्रित माहिती मिळेल. पालकांनाही या शिबिराच्या माध्यमातून एक दिशा मिळेल.बदलत्या काळानुसार युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे.

अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे असा प्रश्न असतो तसेच कोणत्या क्षेत्रात आपल्याला कौशल्य प्राप्त करावे लागेल याबाबत साशंकता असते विद्यार्थ्यांचा संवाद वाढून त्यांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले रोजगार मिळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन राज्यभरात २८८ मतदारसंघात असे रोजगार मिळावे आयोजित केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ते मिळावे यशस्वीपणे पार पाडले जात आहेत असे ही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.