राज्यात सूर्य का आग ओकतोय?

    20-Apr-2023
Total Views | 71
Heatstroke

मुंबई/ठाणे/रायगड : एप्रिल महिन्यात उन्हाच्या कडाक्याने कहर केला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढताच राहिला आहे. बुधवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सिअस ओलांडले असून, सूर्य आग ओकत असल्याने जीवाची काहिली होत होती.
 
ठाण्यात 42.07 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढल्याने, जिल्हा आरोग्य (पान 6 वर) राज्यात सूर्य आग ओकतोय! (पान 1 वरुन) प्रशासनाने 102 अथवा 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक शहरांतील तापमानात वाढ होताना दिसून येत आहे.

शहरातील नैसर्गिक संपदेला हानी पोहोचल्याने तसेच बहुतांश रस्ते सिमेंट-काँक्रिटचे बनल्याने मातीशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करतात. गेल्या काही दिवसात उन्हाचा पारा 41 ते 43 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नोंदवण्यात आली आहे.

उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या वेळादेखील बदलल्या आहेत. दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली असते. तीव्र उष्णतेने डांबरी रस्ते वितळत आहेत. बुधवारी म्हणजेच 19 एप्रिलला तापमानात वाढ होऊन पारा 42.07 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंद झाल्याची माहिती ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.

उष्णतेच्या त्रासासाठी टोल फ्री क्रमांक

उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी,यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेली, घाम येणे थांबलेली व्यक्ती दृष्टीस पडल्यास त्वरित 102 अथवा 108 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
 
ही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्या

प्रौढांमध्ये शरीराचे तापमान 104 फेरहाईटपर्यंत किंवा 40 डिग्री सेल्सिअस पोहोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे, लहान मुलांचा आहार घेण्यास नकार, चिडचिड, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, रक्तस्त्राव होणे, तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे शारीरिक स्वास्थाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 
चला उष्णतेला हरवूया

उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. दुपारच्या वेळी स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाकावेळी दरवाजे खिडक्या उघडा ठेवाव्यात जेणेकरून स्वयंपाक घरात हवा खेळती राहिल.उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावी. अनवाणी उन्हात चालू नये. लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना आतमध्ये ठेवून गाडी बंद करू नये. चहा, कॉफी, मद्य, खूप साखर असलेली आणि कार्बोनेटेड द्रव्याचे सेवन टाळावे. प्रथिनांची अधिक मात्रा असलेले पदार्थ तसेच शिळे अन्न टाळावे. सैलसर व सुती कपडे शक्यतो पांढरे कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी.

रायगडात विक्रमी तापमानाची नोंद
 
बुधवारी रायगड जिल्हा भट्टीप्रमाणे तापल्याने पारा 40 वर पोहोचला आहे. कर्जत येथे सर्वाधिक 42 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे अनेकांना उष्णतेचा मोठा त्रास जाणवला आहे. बुधवारी मुरूड, अलिबाग, श्रीवर्धन या समुद्र किनारपट्टीवरील तालुक्यात तापमान पारा 39 वर पोहोचला असून दक्षिण रायगडात 41 वर तापमान पोहोचले असून अनेकांनी बाहेर पडणे बंद केल्याचे समजले आहे.

10 राज्यांत तापमान चाळीशीपार

सध्या देशातील अनेक राज्यांत उष्णतेची लाट जाणवत असून दहा राज्यांत 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढचे दोन दिवस उत्तर प्रदेश, बिहार, सिक्किम, ओडिशा, बंगाल, झारखंड आणि आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट जाणवेल.

राजस्थान आणि मध्य प्रदेशात पुढचे तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगाणातील अनेक भागांत मंगळवारी जोरदार वार्‍यासह पाऊस झाला. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी झाली आहे. राज्यांनी प्रवासी मजुरांचा उष्णतेपासून बचाव करण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याचा सल्ला केंद्राने दिला आहे. उद्योग आणि बांधकाम कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना थंड पाणी, ओआरएस आणि उष्णतेशी संबंधित आजारांची औषधे देण्यास सांगितले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121