‘एण्डोमेट्रिओसिस’ हा आजार 160 वर्षांपासून माहिती असला, तरी दुर्दैवाने या आजारावर फारसे संशोधन झालेले नाही. या आजारावर खात्रीशीर असा इलाज अजूनही उपलब्ध नाही.
24 वर्षांच्या विद्याला नेहमी हेच वाटायचं की, मासिक पाळीमध्ये असह्य वेदना सगळ्यांनाच होतात, फक्त तिला ते सहन होत नाही. 29 वर्षांच्या प्रियाला तिच्या आजूबाजूच्या सगळ्याच बायका ‘किती गं बाऊ करतेस दुखण्याचा’ असं म्हणायच्या आणि आता लग्नाच्या चार वर्षांनंतर वरवरच्या तपासण्यातदेखील सगळं ’नॉर्मल’ असतानादेखील मूल होत नाही म्हणून वेगवेगळे सल्ले दिले जात आहेत. ही अशी उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला नेहमी ऐकत असतो आणि काय हे बायकांचे दुखणे, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही नाही, असेच असते, असं म्हणून सोडूनही देतो. पण, हे दुखणे असे सहज सोडून देण्यासारखे खरंच आहे का? तर याचे उत्तर ’नाही’ असे आहे. या लक्षणांचे कारण ’एण्डोमेट्रिओसिस’ हे असू शकते. या लेखात आपण जाणून घेऊयात काय आहे हा आजार.
’एण्डोमेट्रिओसिस’ हा प्रजनन संस्थेशी संबंधित आजार आहे. गर्भाशयाच्या आतील बाजूस एक विशेष प्रकारच्या पेशींचा थर असतो. या थराचा गरोदरपणात खूप उपयोग होतो आणि दर महिन्याला मासिक पाळीत हा थर बाहेर पडत असतो. ’एण्डोमेट्रिओसिस’मध्ये हा थर गर्भाशयाच्या बाहेर, जसे की अंडाशय, आतडी, मूत्राशय, मलाशय आणि काही वेळा शरीरातील इतर अवयवांवरदेखील जमा होतो. दर महिन्याला जेव्हा पाळी येते, तेव्हा गर्भाशयातील थराबरोबरच या इतर ठिकाणच्या थरालादेखील संप्रेरके मिळत जातात आणि हा थर अजूनच वाढत जातो. यामुळे पाळीच्या वेळी अतिरक्तस्राव, ओटीपोटात असह्य वेदना, पोटदुखी, पचनसंस्थेशी निगडित त्रास (पित्त होणे, वात होणे, अन्न न पचणे इत्यादी), पाठदुखी अशी लक्षणे दिसू लागतात. हळूहळू सुरुवातीला फक्त पाळीच्या पाच-सहा दिवस होणारा त्रास हळूहळू महिन्यातील 20-22 दिवस आपले अस्तित्व दाखवू लागतो आणि तिथेच या आजाराचा खरा चेहरा दिसू लागतो. सतत थकवा जाणवणे, ‘अॅनिमिया’ आणि मुख्य म्हणजे वंध्यत्व हीदेखील या आजाराची लक्षणे आहेत. वयाच्या साधारण 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान या आजाराचे निदान होते. जरी पाळीच्या सुरुवातीपासून ही लक्षणे जाणवत असली, तरी दुर्दैवाने भारतात मासिक पाळीचे दुखणे सामान्य मानले जात असल्याने याचे निदान व्हायलाच साधारण आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. सामान्यतः जेव्हा प्रयत्न करूनदेखील गरोदर होता येत नाही, तेव्हाच 75 टक्के केसेसमध्ये ’एण्डोमेट्रिओसिस’चे निदान होते. या आजाराचे पक्के निदान हे ‘लॅप्रोस्कॉपिक’ शस्त्रक्रिया करून किंवा ‘एमआरआय’ करून केले जाते.
जरी वैद्यकीय जगात ’एण्डोमेट्रिओसिस’ हा आजार 160 वर्षांपासून माहिती असला, तरी दुर्दैवाने या आजारावर फारसे संशोधन झालेले नाही. या आजारावर खात्रीशीर असा इलाज अजूनही उपलब्ध नाही. दुखणे कमी होण्यासाठी वेदनाशामक गोळ्या आणि काही ‘हॉर्मोनल’ गोळ्या देऊन या आजाराच्या लक्षणांवर इलाज केला जातो. बर्याचदा शस्त्रक्रिया करून ‘एण्डोमेट्रिअल’ पेशींचा थर इतर अवयवावरून काढून टाकणे, ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रियादेखील केली जाते, जेणेकरून दुखणे आणि विशेषतः मूल होण्यासाठी प्रयत्न करता यावेत. मात्र, अशा शास्त्रक्रियेनंतरदेखील या पेशी इतरत्र वाढतच राहतात आणि पुन्हा हा त्रास सुरु होतो.
मात्र, हा आजार ’मूल न होणे’ याच्याही पलीकडचा आहे. महिन्यातील 20-22 दिवस दुखणे, पित्त, वात, पाठदुखी, मूत्राशयाशी संबंधित त्रास, थकवा या अशा अनेक त्रासांमुळे 80 टक्के स्त्रियांना त्यांची नोकरी सोडावी लागते. एक तर इलाजासाठी होणारा वारेमाप खर्च, त्यात स्वतः कमावता न येणे यामुळे फक्त या स्त्रियाच नाही, तर पूर्ण कुटुंब आर्थिक तसेच मानसिकरित्या त्रासून जाते. ज्या स्त्रिया बाळासाठी प्रयत्न करत असतात, त्यांना ‘हॉर्मोनल’ इलाज करता येत नाही. त्यामुळे त्यांना हे असह्य दुखणे सहन करण्यावाचून पर्याय नसतो, ज्यामुळे त्या मानसिकरीत्या खचून जातात. ज्या स्त्रिया ‘हॉर्मोनल’ गोळ्या घेतात, त्या या गोळ्यांच्या दुष्परिणामांमुळे नैराश्याच्या गर्तेत जातात. आता या आजाराचा निश्चित असा इलाज नसल्याने बर्याचदा जेव्हा स्त्रिया डॉक्टरांकडे जातात तेव्हा त्यांना असे वाटते की, डॉक्टरांना त्या किती त्रासातून जात आहेत, याची कल्पनाच नाही. मात्र, त्यांचेदेखील हात या आजाराने बांधून टाकलेले असतात. सध्या तरी या आजाराचा पक्का इलाज यायला कदाचित अजून काही वर्षे जातील. मात्र, तोपर्यंत आपण या आजाराची योग्य ती माहिती घेऊन, त्यांना समजून घेऊन आपल्या परीने त्रासलेल्या स्त्रियांना जास्तीत जास्त आनंदी आयुष्य जगण्यास मदत करू शकतो. मार्च हा ’जागतिक एण्डोमेट्रिओसिस महिना’ म्हणून ओळखला जातो. तेव्हा, यानिमित्ताने ’एण्डोमेट्रिओसिस’बद्दल जाणून घेऊ आणि या आजारावर एकत्र मात करू.
(लेखिका गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये हेल्थकेअर मॅनेजमेंट विषयाच्या असिस्टंट प्रोफेसर आहेत.)
- डाॅ. सुप्रिया फडणवीस